Monday, October 29, 2018

जतमध्ये साथीच्या आजारांनी नागरिक हैराण


जत,(प्रतिनिधी)-
 जत शहरात गेल्या दोन महिन्यांपासून साथीच्या आजारांमुळे नागरिक अक्षरश: बेजार झाले आहेत. इतके असतानादेखील याकडे आरोग्य खाते व नगर परिषद यांचे  दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिक संताप व्यक्त होताना दिसत आहे. सत्ताधार्यांना नागरिकांची फिकीरच नाही, असा आरोप होत आहे.
 गेल्या सहा महिन्यांपासून शहरात अनेक नागरिकांना चिकनगुनिया, मलेरिया,डेंग्यूचा या आजारांनी थैमान घातले आहे. शहरात अस्वच्छते- मुळे या साथीच्या आजारांचे प्रमाण प्रचंड वाढले असून आरोग्य यंत्रणा मात्रव्हेंटिलेटरवर असून जिल्हाधिकार्यांनी याची चौकशी करावी, अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे. जत नगरपालिकेच्या वतीने कचरा उचलण्याचे टेंडर दिले आहे. मात्र सत्ताधारी व नगरसेवक यांच्यात वारंवार होणार्या जुगलबंदीमुळे या टेंडरची नक्की काय अवस्था आहे, हे नागरिकांनाही कळायला मार्ग नाही. महिन्यातून आठ ते दहा दिवस कचरा उचलला जात नाही. त्यामुळे अनेक नागरिक वैतागून कचरा रस्त्याच्या बाजूला टाकतात. तो कचरा पुन्हा गटारीत गेल्यानंतर गटार तुंबून या ठिकाणी डासांचे प्रमाण वाढत आहे. याबाबत विविध भागातील अनेक नागरिकांनी नगरपरिषदेकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र मुख्याधिकार्यांसह पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.
नगरपरिषदेचे शहरातील आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. अनेक प्रभागात अस्वच्छता व दुर्गंधी पसरलेली आहे. जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा या शहरात काम करत नाही. त्यामुळे चिकनगुनिया व डेंग्यूचे रुग्ण वाढले असून खासगी दवाखान्यांत रुग्णांची रीघ लागली आहे. याची दखल घेऊन मुख्याधिकारी व सत्ताधार्यांनी वेळीच लक्ष देऊन जत शहरात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जत शहरात गेल्या सहा महिन्यांपासून चिकन गुनियाची साथ सुरू झाली आहे. शहरातील काही लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व काही पत्रकारांनाही चिकनगुनिया झाला असून जत नगरपरिषदेने चिकुन गुनियाचा निपटारा होण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संजय कांबळे यांनी केली आहे. जत शहरातील अस्वच्छता पाहता नगरपरिषदेने स्वतंत्र कक्ष स्थापन करून गटारी स्वच्छ करणे, रस्ते स्वच्छ करणे, स्वच्छतागृह स्वच्छ करणे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment