Saturday, October 27, 2018

पिस्तूल, रिव्हॉल्व्हर तस्करीप्रकरणी तिघांना अटक


सांगली,(प्रतिनिधी)-
 गुंडाविरोधी पोलिस पथकाने दोन पिस्तूल आणि एका रिव्हॉल्व्हरसह तिघांना अटक केली आहे. पिस्तुलाची तस्करी करणारा शशिकांत रवींद्र जाधव (वय 21, गुरसाळे, ता. कराड) याला पकडल्यानंतर त्याच्याकडून अशी शस्त्र खरेदी करणार्या दोघांची नावे समोर आली. जाधव बी.. मेकॅनिकलचे शिक्षण घेत असून त्याच्यावर मोटारसायकल चोरीचे तब्बल अकरा गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती पुढे आल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.
 शहरातील महावीर उद्यानानजीक एक तरुण संशयस्पदरित्या फिरत असून त्याच्या कमरेला पिस्तुलासारखी वस्तू दिसत असल्याची माहिती पथकाचे कर्मचारी संतोष गळवे यांना मिळाली होती. त्यानंतर डोके आणि त्यांच्या पथकाने कारवाई करत जाधव याला पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसासह पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने विश्वजित विलास माने (वय 34, आंधळी, ता. पलूस) आणि मंगेश शिवाजी कदम (वय 34, माऊल अपार्टमेंट, धायरी, पुणे) यांना अशी शस्त्रे दिल्याची माहिती दिली. त्यानंतर पथकाने मानेकडून पिस्तूल आणि चार काडतुसे जप्त केली तर पुण्यातून मंगेश कदम याला रिव्हॉल्व्हर आणि दोन काडतुसांसह अटक केली. सुमारे दीड लाखाची देशी बनावटीचीही अग्निशस्त्रे जप्त केल्यानंतर तिघांनाही कोर्टासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी कोर्टाने तिघांनाही तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

No comments:

Post a Comment