Tuesday, October 30, 2018

दिवाळीसाठी बाजारपेठ सजली


विविध प्रकारच्या खरेदीसाठी दुकानात गर्दी
जत,(प्रतिनिधी)-
हिंदू धर्मियांचा सर्वात उत्साहाचा सण अशी दिवाळीची ओळख आहे. घरोघरी विविध प्रकारचे फराळाचे जिन्नस बनविले जाऊ लागले आहेत. रांगोळ्या व रंगांची खरेदी सुरू झाली आहे. तोरणे आणि आकाशदिवे बाजारात आले आहेत. विविध प्रकारच्या व विविध आकारातील पणत्या घेऊन विक्रेते आले आहेत. लहान मुले किल्ले करण्याच्या तयारीला लागले आहेत. साड्या, ड्रेस मटेरियल, रेडिमेड ड्रेसेस आणि कॉस्मेटिक्स खरेदीसाठी महिला व तरुणींची गर्दी बाजारात दिसू लागली आहे; तर दुचाकीचारचाकी वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी बुकिंग सुरू झाले आहे.
 दिवाळीच्या निमित्ताने दारात तोरणे लावण्याची परंपरा आहे. पूर्वी झेंडूच्या फुलांच्या माळा घरी बनविल्या जात व मोठी तोरणे आंब्याच्या पानांसह लावली जात. मात्र आता काळ बदलला आहे. तयार फराळाचे जिन्नस ज्याप्रमाणे उपलब्ध आहेत, त्याचप्रमाणे कृत्रिम तोरणे बाजारात दाखल झाली आहेत. वेगवेगळ्या आकाराची तोरणे घेऊन परराज्यातील विक्रेते गल्लीबोळातून फिरत आहेत. तसेच सांगली-मिरज रस्त्यावर देखील जागोजागी तोरणे लावून हे विक्रेते मुक्काम ठोकून बसले आहेत. या कृत्रिम तोरणांना चांगली असल्याचे दिसत आहे. असली फुलांच्या मनमानी किमती विक्रेते सांगत असल्याने कृत्रिम फुलांकडे ग्राहक मोठ्या प्रमाणात वळला आहे.
जतमध्ये अशी तोरणे बनवून विकणारा एक समाज सातारा रोडलगत वसती करून आहे. गेल्या महिनाभरापासून या गल्लीत घरोघरी तोरणे बनवण्याचे काम सुरू होते. एका विक्रेत्याची दररोज पन्नास-साठ तोरणे विकली जातात. शाळांना सुट्ट्या पडल्या नसल्या तरी सकाळ-संध्याकाळ बच्चे कंपनीची गर्दी मावळे विक्रेत्यांकडे होत आहे, तर फटाके विक्रीची दुकाने अद्याप लागलेली नाहीत. सध्या बर्यापैकी गर्दी रेडिमेड कपड्यांच्या दुकानातच दिसत आहे. मात्र अद्याप नोकरदारांचे पगार  झाले नसल्याने दुकानांमध्ये मोठी गर्दी दिसून आलेली नाही. एक-दोन दिवसात हे चित्र पालटेल अशी आशा आहे. सध्या फराळाचे जिन्नस रेडिमेड घेण्याकडे ग्राहकांचा जास्त कल असल्याने या विक्रेत्यांकडे देखील मोठी ऑर्डर नोंद झाली आहे. मेवामिठाईची दुकाने सजली आहेत.

No comments:

Post a Comment