जत,(प्रतिनिधी)-
जत नगरपरिषदेमध्ये सत्ताधार्यांनी भ्रष्ट कारभाराचा कळस गाठला असून पैशाला सोकालवलेल्या सत्ताधार्यांच्या कारभाराचे श्राद्ध घातल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा खणखणीत आरोप भाजपाचे नगरसेवक विजय ताड यांनी पत्रकार बैठकीत केला.
जत पालिकेचा भ्रष्ट कारभार आणि भाजपाचे विकासाचे धोरण या मुद्द्यांवर भाजपाच्या नगरसेवकांनी पत्रकार बैठक आयोजित केली होती. यावेळी नगरसेवक उमेश सावंत, प्रकाश माने, राजू यादव, डॉ. प्रवीण वाघमोडे, संतोष मोटे, अण्णा भिसे, किरण शिंदे आदी उपस्थित होते. विजय ताड म्हणाले, जत पालिकेत काँग्रेस आणि ऋाअष्ट्रवादीची सत्ता आहे. पालिकेत आमचे आठ नगरसेवक आहेत. आमचा सत्ताधारी पक्षाला चांगल्या कामाला पाठिंबा देण्यासाठी नेहमीच पुढाकार असतो. पण सत्ताधार्यांना चांगली कामे करायची नाहीत. ज्या कामात पैसे मिळतात, त्याला प्राधान्य देण्याचे धोरण त्यांनी आखले आहे. शहरातील कचर्याचा प्रश्न गंभीर असताना वारंवार पाचगणी येथील ठेकेदाराला मुदतवाढ दिली जात आहे.शिवाय गेल्या चार महिन्यांपासून शहरातील कचरा उठवण्यात सतत अडथळे आल्याचे दिसून येत आहे. महिना अकरा लाख रुपये यावर खर्ची पडत आहेत. मात्र कचर्याचे निर्मूलन होताना दिसत नाही. शहरवासिय चार महिन्यांपासून विविध आजारांशी लढा देत आहेत.
विजेचा प्रश्नही मोठा गंभीर आहे. साठ लाखाचे बिल अडल्याच्या कारणावरून विजेचे कोणतेच काम केले जात नाही. पालिकडे जवळपास 15 कोटी 68 लाखांचा निधी पडून आहे. आमदार विलासराव जगताप यांनीही पालिकेला दोन कोटी रुपये दिले आहेत. आम्ही अनेक कामे सुचवली आहेत,पण त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. सत्ताधारी मंडळी आपल्या मर्जीतीलच कामे करत आहेत. पालिकेचा कारभार अजिबात सुधरायला तयार नाहीत. नोंदी, एनओसी, विविध दाखले यात भ्रष्टाचार केला जात आहे. मात्र आम्ही आता स्वस्थ बसणार नाही. सत्ताधार्यांचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणल्याशिवाय राहणार नाही.
No comments:
Post a Comment