शासकीय मदतीची गरज; पाण्याचे टँकर सुरू करा
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात मान्सून आणि परतीच्या मोसमी पावसाने
पाठ फिरवल्याने तालुक्यात दुष्काळाची अभूतपूर्व परिस्थिती ओढवली असून शेतीला तर सोडून
द्या,
पिण्याच्या पाण्याचेदेखील वांदे झाले आहेत. लोकांना
पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने
पाण्याच्या टँकरचे प्रस्ताव अडवून ठेवल्याने आता गावांमध्ये संताप व्यक्त होऊ लागला
आहे.
जत तालुक्यातील बहुतांश तलाव कोरडे पडले आहेत. आता येणार्या सहा महिन्यांत पिण्याच्या पाण्यासाठी दाही
दिशा भटकण्याची वेळ येथील शेतकरी व नागरिकांवर येणार असून 30 पेक्षा अधिक गावांतील नागरिकांनी टँकरची मागणी केली आहे. मात्र शासनाच्या लाल फितीच्या कारभारामुळे अद्यापही गावात टँकर सुरू नसल्याने
येथील नागरिक प्रचंड नाराज झाले आहेत. खरीप व रब्बीची पेरणी केली
आहे; मात्र पावसाचा पत्ता नसल्याने संपूर्ण पेरणी वाया गेली.
खरिपाची आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी लागली आहे.
आता तर रब्बी हंगाम ही जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. जत तालुक्यात
यावर्षी पाऊस झालाच नाही; तर ऑक्टोबर महिना संपत आला तरी वरुणराजा
रुसलेलाच आहे. आता पावसाची शक्यता दुरावली असून अनेक नागरिकांना
आता टँकरच्या मागणीशिवाय पर्याय राहिलेला नाही.
जत तालुक्यात पावसाळ्यात खळाळणारे ओढे गेल्या वर्षभरापासून
शांत आहेत. नागरिकांना जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचेही
अवघड झाले असून प्रशासनाने थेट बांधावर जाऊन ग्राउंड लेव्हल सर्व्हे करावा व पिण्याच्या
पाण्याचे टँकर व चारा छावण्या चालू कराव्यात, अशी मागणी काँग्रेसचे
जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील यांनी केली आहे. जत तालुक्यात
डाळिंब व द्राक्षबागांचे पीक गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात उभे राहिले आहेत.
कोट्यवधी रुपयांचे कर्ज उभे करून शेतकर्यांनी
डाळिंब व द्राक्ष बागा उभे केले आहेत. यावर्षी पडलेल्या दुष्काळाच्या
परिस्थितीमुळे शेतकर्यांच्या बागा जळून जात आहेत. जेसीबीच्या साह्याने बागा काढून टाकल्या आहेत. या शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांचे अनुदान द्यावे,
अशी मागणी रिपाइंचे अशी महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय कांबळे यांनी केली.
जत तालुक्यातील
25 ते 30 गावांनी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू
करावेत, अशी मागणी मागणी केली आहे; मात्र
प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही. प्रशासनाने टँकरने पाणीपुरवठा
करावा; अन्यथा काँग्रेसच्यावतीने आंदोलन करावे लागेल,
असा इशारा जिल्हा परिषद सदस्य विक्रम सावंत यांनी दिला आहे. तहसीलदारांनी येथे दुष्काळी कक्ष स्थापन करून जत तालुक्यातील नागरिकांना दुष्काळासाठीच्या
उपाय- योजना कराव्यात, अशी मागणी जिल्हा
परिषद सदस्य सरदार पाटील यांनी केले. 19 गावांनी टँकरचे प्रस्ताव
दिले असून ते प्रस्ताव ग्रामीण पाणीपुरवठा व मंडल अधिकारी यांच्याकडे चौकशीसाठी दिल्याची
माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.

No comments:
Post a Comment