Wednesday, October 24, 2018

सांगली जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा


गुन्हेगारीचा आलेख चढता
जत,(प्रतिनिधी)-
सांगली आणि जिल्ह्याभरात गेल्या काही दिवसांतील खून,मारामार्या,चोर्या आणि गँगवारचे उडणारे खटके पहाता जिल्हयात गुन्हेगारीचा आलेख गतीने वाढू लागला असल्याचे स्पष्ट झाले आहे. दहा महिन्यात दीड हजारांवर चो़र्या आणि घरफोड्या झाल्या आहेत. त्यामध्ये चार पाच कोटीपर्यंत मुद्देमाल लंपास करण्यात आला असून गुन्हे उघडकीस आणणे आणि मालमत्ता रिकव्हरीचे प्रमाण अत्यल्प आहे .वाढत्या गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी खाकीचेमनोबलवाढविण्याची गरज आहे.
     गेल्या काही दिवसांत जिल्हयातील कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. अनिकेत कोथळे प्रकरणापासून जिल्हा पोलीस दल पराभूत मानसिकतेमध्ये गेले आहे. पोलीसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. त्याचा परिणाम म्हणून दिवसा ढवळया खून पाडले जात आहेत. अनेक गुन्हेगार आणि टोळयांच्या प्रमुखांचे राजकीय पुनर्वसन झाले असल्याने गुन्हेगार शिरजोर बनले आहेत. दबावामुळे वरिष्ठ अधिकारी ,पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी जबाबदारी घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे पोलीसही कातडी बचाव धोरण घेऊ लागले आहेत. संधी मिळेल तेव्हा समाजकंटक खाकीचे वस्त्रहरण करण्याचे धारिष्ठय दाखवू लागले आहेत. अपवाद वगळता बऱयाच वेळा पोलीसांना उघडया डोळयांनी पाहण्याशिवाय काही करता येत नाही. खासगीत बोलताना पोलीस अधिकारी आणि कर्मचारीही आपल्या भावना व्यक्त करतात.
  कायदा व सुव्यवस्थेचा बोजावारा उडाल्याने पोलीसांना गुन्हे प्रकटीकरणासाठी पुरेसा वेळच मिळत नसल्याचे चित्र आहे. किंबहुना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि गुंडा विरोधी पथक वगळता बहुतांशी पोलीस ठाण्यांचे कामकाज पाटया टाकण्याच्याच मानसिकतेत सुरू आहे.परिणामी समाजमनातील पोलीसाबद्दलचा विश्वास,खाकीबद्दलचा आदर आणि गुन्हेगारातील धाकही कमी झाल्याचे चित्र आहे.  एक ऑगस्ट ते 30 सप्टेंबर दरम्यान केवळ मालमत्ता विषयक गुन्हयानी दीड हजारांचा पल्ला गाठला आहे. सरासरी दिडशेहून अधिक घरफोडया,चोऱया आणि दरोडयाचे गुन्हे घडत आहेत.
 जानेवरीपासून ती सप्टेंबर पर्यंत जिल्हयात 28 दरोडे पडले आहेत. या दरोडयातील 24 गुन्हे पोलीसांनी उघडकीस आणले आहेत. पण जबरी चोरीच्या  111 गुन्ह्यापैकी केवळ 57 जबरी चोऱया उघडकीस आल्या आहेत. घरफोडीच्या 302 घटनापैकी 59 तर चोरीच्या 1134 पैकी केवळ 254 घटना उघडकीस आल्या आहेत. त्यातूनच वाढत्या गुन्हेगारीचा आलेख निदर्शनास येतो.
   गेल्या दहा महिन्यातील चोर्या,घरफोड्या आणि दरोड्यातून एकूण चार कोटी 74 लाख 46हजारांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. तर पोलीसांनी काही गुन्हयांचा छडा लावत एक कोटी 71 लाख 26 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सोमवारी विश्रामबाग पोलीस ठाण्यात पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांच्या हस्ते ज्या नागरिकांच्या चोऱया झाल्या होत्या त्यांना त्यांचे मुद्देमाल परत देण्यात आले. पण रिकव्हरी वाढून चोऱया,घरफोडयांना प्रतिबंध करण्याचे मोठे आव्हान पोलीसासमोर निर्माण झाले आहे. तर कायदा व सुव्यवस्थेची बिघडलेली घडी दुरूस्त करण्यासाठीही गृहविभागाने गांभिर्याने दखल घेण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment