Tuesday, October 23, 2018

कमी पावसातही सिंचन साठा वाढल्याचा मंत्री राम शिंदेंचा दावा


जत,(प्रतिनिधी)-
 भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने (जीएसडीए) केलेल्या अभ्यासाच्या आधारावर जलयुक्त शिवाराच्या पाण्याच्या पातळीत घट झाली, असा निष्कर्ष काढता येणार नाही. उलट कमी पावसातही सिंचन साठा वाढला. परिणामी, पिकांना पाणी देता आले आणि उत्पादन वाढले आहे. त्यामुळे विरोधक चुकीच्या पद्धतीने विरोध करून नागरिकांची फसवणूक करीत असून त्यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे प्रत्युत्तर जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी नुकतेच पुण्यात पत्रकार परिषदेत दिले.
 शिंदे म्हणाले, ज्यांना जलसंधारणाच्या क्षेत्रातील किंचीतही माहिती नाही, अशा मंत्र्यांनी केवळ जनतेची दिशाभूल करत महाराष्ट्रातील जनतेचा पैसा स्वतःची झोळी भरण्यासाठी केला आहे. केवळ विरोध म्हणून विरोध करत आहे. मात्र प्रत्यक्षात जलयुक्त शिवाय योजनेची माहिती पाहा. राज्यातील 353 पैकी 101 तालुक्यातील भूजल साठा वाढला आहे. जवळपास 700 कोटींचे काम श्रमदानाने झाले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यंदा कमी पावसामुळे आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध पाण्याचा उपसा झाल्याने त्यात अत्यल्प घट झाली. टंचाईत पाण्याचा अतिउपसा होतोच.
पाण्याचे तीव्र दुर्भिक्ष्य असणार्या प्रदेशात सुद्धा हे यश मिळणे, हे त्या क्षेत्रातील तज्ज्ञालाच कळू शकेल, असे स्पष्ट करून राम शिंदे पुढे म्हणाले, मुळात जलयुक्त शिवार योजनेची उपयोगीता हीच मुळी पाणी मुरविणे आणि कमी पाऊस झाल्यास ते पाणी शेतीला वापरता येणे ही आहे. जलयुक्त शिवार अभियानाचे पाणी होते, म्हणूनच यंदाच्या काळातही काही प्रमाणात पिकं वाचविण्यात शेतकर्यांना यश मिळाले. सोलापूरसारख्या जिल्ह्यांत 2013-14 या हंगामात खरीपाखालील क्षेत्र हे 80 हजार हेक्टर होते. ते 2016-17 या हंगामात 3 लाखांवर गेले. यंदा तर केवळ 38 टक्के पावसातसुद्धा या जिल्ह्यांत खरिपाचे क्षेत्र 2.50 लाख हेक्टर इतके राहिले, हे यश केवळ जलयुक्त शिवारचेच आहे. यंदाच्या वर्षी कमी पाऊस पडला असला तरी पीक कापणी प्रयोगाचे जे प्रारंभिक निष्कर्ष आहेत, त्यातून उत्पादकतेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ऑक्टोबर महिन्यांतील पाणी उपशासाठी विजेच्या मागणीत जी 29 टक्के वाढ झाली, ती सुद्धा त्याचेच निदर्शक आहे.
जलयुक्त शिवारचे साठे जागोजागी नसते, तर हे परिणाम साध्य करताच आले नसते. राज्यातील 353 तालुक्यांपैकी 101 तालुक्यांमध्ये पाणीपातळीत वाढ झाली आहे. सोयाबीनच्या उत्पादकतेत 11.51 टक्के, मूग पिकात 1.18 टक्के, उडिद पीकात 2 टक्के आणि बाजरीच्या पिकात 8 टक्के वाढ दिसून येत आहे. हे यश जलयुक्त शिवारचेच आहे. गावांगावांत पाणी उपलब्ध असल्याने शेतकर्यांना त्यांचे पीकसंगोपन करता आले. जलयुक्त शिवार नसते, तर दुष्काळी वर्षांत उत्पादकतेत मोठ्या संख्येने घट झाली असती. पण, तसे झालेले नाही. हे यंदाचेच उदाहरण नाही, तर 2017-18 या वर्षांत सुद्धा अवघा 84 टक्के पाऊस झालेला असतानाही 180 लाख मेट्रीक टन उत्पादन झाले होते. 2013-14 मध्ये 124 टक्के पाऊस पडूनही केवळ 138 लाख मेट्रीक टन उत्पादन घेता आले होते.

No comments:

Post a Comment