जत,(प्रतिनिधी)-
यंदा खरिप आणि रब्बी हे दोन्हीही हंगाम पावसाअभावी
वाया गेल्याने ऊसतोडणीला जाणार्या मजुरांच्या संख्येत लक्षणीय
वाढ झाली आहे. हाताला काम नसल्याने आणि प्यायला पाणी नसल्याने
नागरिकांनी यंदा ऊसतोडणीला जाण्याचा निर्णय घेतला आहे. साखर कारखान्यांची
धुराडी पेटली असून जत तालुक्यातून मजुरांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले आहे.
जत हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे. ’म्हैसाळ’चे पाणी येणार-येणार म्हणून
गेली तीस वर्षे झाली तरी पूर्वभागात अजूनही पाण्याचा एक थेंब आला नाही. त्यामुळे येथील ऊसतोड मजुरांना दर वर्षी ऊसतोडीला जाण्याशिवाय पर्याय राहिला
नाही. हजारो मजूर आता पुन्हा एकदा आपले विंचवाचं बिर्हाड पाठीवर घेऊन ऊसतोडीसाठी जाताना दिसत आहेत. जत तालुक्यात
कधीतरी दोन ते तीन वर्षांतून एकदा पाऊस पडतो. त्या पडलेल्या पावसावर
कशीबशी शेती करून आपलं कुटुंब जगण्यासाठी तालुक्यातील पंचवीस ते तीस हजार मजूर दरवर्षी
ऊसतोडीसाठी जातात. यावर्षी, गेले वर्षभर
पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे कुटुंब जगवायचे कसे ? यासाठी हजारो ऊसतोड मजूर दिवाळीच्या तोंडावर ऊसतोडीसाठी जाताना दिसत आहेत.
यावेळी स्थलांतर करणार्या मजुरांच्या संख्येत
मोठी वाढ झाली आहे.
अनेक गावांत मुकादमाची दोन महिन्यांपासून धांदल सुरू
आहे.
साखर कारखान्याकडून भरमसाठ घेतलेली उचल या टोळ्यांना व मजुरांना देण्यासाठी
अनेक मुकादम आपल्या चारचाक्या गाड्या घेऊन जत तालुक्यातील गावोगावी फिरताना दिसत आहेत.
मजुरांना अॅडव्हान्स देऊन त्यांची टीम तयार करून
त्यांना ट्रॅक्टरमधून ऊसतोडीसाठी घेऊन जाण्यासाठी तालुक्यातील गावागावांत रेलचेल दिसत
आहे त्यामुळे अनेक गावांत हंगाम सुरू झाल्याची चाहूल अनेकांना लागली आहे. ऊस हंगाम संपून चार ते पाच महिन्यांपूर्वी ट्रॅक्टर आणून आपल्या घरासमोर लावलेली
ट्रॅक्टरमालक आता पुन्हा एकदा ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग करून साफसफाई करून ऊस तोडणीसाठी
सज्ज झाले आहेत. अनेक ट्रॅक्टर मालक स्वतः टोळ्या तयार करून ऊसतोडणी
करताना दिसत आहेत.
सांगली जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांसाठी जत तालुक्यातील
ऊसतोड टोळ्या कृष्णाकाठच्या भिलवडी, अंकलखोप,
माळवाडी, सुखवाडी आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल
झाल्या आहेत. गतवर्षीच्या हंगामाप्रमाणे यंदाचा हंगाम पावसामुळे
उशिरा सुरू होत आहे. कृष्णाकाठ हा उसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो.
यंदा उसाची लागवड कमी असल्याने सर्वच कारखानदार ऊस तोड यंत्रणा गतिमान
करून ऊस घेऊन जाणार्या तयारीला लागली आहेत. यामध्ये क्रांती साखर कारखाना, राजारामबापू साखर कारखाना,
सोनहिरा साखर कारखाना, कृष्णा साखर कारखाना कराड;
तसेच सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्याकडेही या तालुक्यातील ऊसतोड
मजूर जाताना दिसत आहेत. यंदाच्या ऊस हंगामात ऊस पळवापळवीचे प्रमाण
वाढणार आहे. त्यामुळे अनेक कारखानदार आपल्या टोळ्या सज्ज करण्यासाठी
तयारीला लागले आहेत.
जत तालुक्यातील
अनेक महिला व पुरुष आपल्या मुलांना, आपली जनावरे बरोबर घेऊन ऊसतोडीला
जातात. त्यामुळे अनेक गावातील शाळा व गावे आता ओस पडणार आहेत.
त्यामुळे शाळेतील हजेरीपटावरील विद्यार्थीसंख्या कमी होणार आहे.
अनेक गावचे बाजार व व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे. पाणी पाणी म्हणत येथील अनेक पिढ्या आता संपून गेल्या असून आई-वडिलांना कोयता हातात घेतल्याशिवाय येथील नागरिकांना पर्याय राहिला नाही.
No comments:
Post a Comment