Sunday, October 28, 2018

दहावी-बारावी परीक्षेचे शुल्क माफ करावे


विद्यार्थ्यांसह पालकांचीही मागणी
जत,(प्रतिनिधी)-
खरिपांच्या उत्पादनात झालेली घट आणि सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे हवालदिल झालेला शेतकरी पालक चिंतेत आहे. त्यातच बोर्डाच्या परीक्षेचे शुल्क भरण्यासाठी पाल्यांकडून होत असलेली पैशांची मागणी आणि पालकांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांमधून जोर धरत आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च 2019 मध्ये घेण्यात येणार्या दहावी-बारावी परीक्षांचे प्रवेशपत्रे भरण्याचे काम विद्यालयात अंतिम टप्प्यात सुरू आहे. दुसरीकडे शेतकर्यांकडे पैसे नसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेतातील पिके हातची वाया गेली आहेत. शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. ऑक्टोबर महिन्यात दुष्काळाची घोषणा केली जाणार असल्याचे राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगत आहेत. एकीकडे राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून बारावीपर्यंत विद्यार्थींना (मुलींना) मोफत पास देण्यात आले आहेत. तर मुलांना मात्र पैसे भरुनच शाळा कॉलेजला यावे लागत आहे. शालेय शिक्षण विभागाकडून दुष्काळी परिस्थितीत विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी परीक्षा शुल्क माफीची घोषणा करावी. दहावी व बारावी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र निःशुल्क स्वीकारावेत, अशी मागणी होत आहे.
शैक्षणिक वर्षांत दहावीचा अभ्यासक्रम बदलला आहे. यावर्षी अभ्यासक्रम नवीन असल्याने नवीन पुस्तके व शैक्षणिक साहित्य खरेदीवर खर्च झाला आहे. खरीप उत्पादनात झालेली घट, पाण्याअभावी रब्बीच्या पेरण्या करू न शकल्याने शासनाच्या परीक्षा शुल्क माफीचा, मदतीचा थोडा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा, अशी अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment