Wednesday, October 31, 2018

शेतमाल बाजार नियंत्रणमुक्तीचे सांगलीत स्वागत


सांगली,(प्रतिनिधी)-
काँग्रेस, समाजवादी व डाव्या विचारसरणीच्या तत्कालिन सरकारनी शेती व शेतकरी विरोधी धोरण घेत शेतमाल बाजारावर नियंत्रणे लादली होती. मात्र विद्यमान सरकारने राज्यपाल विद्यासागर राव यांच्या आदेशाने काढलेल्या अध्यादेशाद्वारे हे शेतमाल बाजार नियंत्रण मुक्त केला आहे. बाजार समिती तीच्या सीमांकीत बाजार क्षेत्रात कृषी उत्पन्नाच्या आणि पशूधनाच्या पणनाचे विनियमन करणार नाही. बाजार समिती प्रमुख बाजारतळ, उपबाजार तळ व बाजारउपतळ यातील कृषी उत्पन्नाच्या व पशूधनाच्या पणनाचे विनियमन करील अशी तरतूद केली आहे. त्यामुळे शेतमाल बाजारपेठ नियंत्रण मुक्त झाली असुन शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या अनेक दिवसांच्या लढ्याला यश आले आहे असा दावा करीत संघटनेच्यावतीने साखर वाटप करून आनंद साजरा करण्यात आला.
या निर्णयाचे स्वागत करीत विद्यमान भाजप सरकारचे अभिनंदन करण्यात आले. संघटनेच्या गणपती मंदिर कार्यालयासमोर साखर वाटप करण्यात आली. यावेळी संजय कोले यांनी सांगितले, शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना अनेक दिवसांपासुन शेतमाल बाजार नियंत्रणमुक्त करावा अशी मागणी करीत होती. मागील सरकारने शेतमाल बाजार पूर्णपणे बाजारसमित्या, अडते, व्यापारी, हमाल, तोलाईदार व राजकारणी यांच्या हातात ठेवला. शेतकर्यांना त्याच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकारच ठेवला नाही. त्याचा फटका शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात बसला. शेतकर्यांचे मोठे शोषण झाले व शेतकरी आत्महत्या करू लागले. उत्पादन खर्च निघेल अशीही दराची हमी नव्हती. शेतमाल हव्या त्या दराने लुटला जात होता. त्यामुळे शेतमाल बाजार नियंत्रणमुक्त करावा अशी मागणी लावुन धरली व त्यासाठी अनेक आंदोलने केली. या आदेशाने आता शेतकरी सीमांकीत क्षेत्रात शेतमालाचे पणन करू शकतील. तसे स्वातंत्र त्यांना मिळाले आहे. हे संघटनेच्या दिर्घकालीन लढ्याचे यश आहे. शेतकर्यांना धान्य,कापूस, तेलबिया, भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा, पशूधनाचा दर ठरवण्याचा अधिकार मिळाला आहे तर व्यापार्यांना खरेदी विक्रीचा अधिकार मिळाला आहे. इंदिरा गांधींनी 1972 साली केलेल्या गरीबी हटावच्या घोषणेत शेकतरी शोषला गेला. संघटनेने याबाबत आवाज उठवला. संघटनेमुळेच 2015 पासुन अडत, हमाली व तोलाई, लेव्ही खरेदीदाराकडुन वसुल करण्याचा निर्णय झाला आहे.

No comments:

Post a Comment