विद्यार्थ्यांचा सवाल
जत,(प्रतिनिधी)-
दिवाळी जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतशी त्याची तयारी सुरू झाली आहे. घराची साफसफाई,
रंगरंगोटी याकामांना गती आली आहे. मुलांनाही कधी
एकदा सुट्ट्या पडतील याचे वेध लागले आहेत. विशेष म्हणजे यंदा
दिवाळीच्या पहिल्यादिवसांपर्यंत शाळा सुरू राहणार आहेत. त्यामुळे
मुलांची किल्ले बनवण्याची अडचण झाली आहे. सध्या परीक्षा सुरू
असल्याने मुलांना अभ्यासाला वेळ द्यावा लागत आहे.
यंदा दिवाळीची सुट्टी 5 नोव्हेंबरपासून पडणार आहे आणि याच दिवशी दिवाळीचा पहिला दिवस आहे. या दिवशी धनत्रयोदशी आहे. त्यामुळे मुलांचा शिक्षकांना
आम्ही किल्ला कधी बनवायचा असा सवाल आहे. यावर्षीपासून प्राथमिक
आणि माध्यमिक दोन्ही शाळांना एकदमच सुट्टी पडणार आहे. यापूर्वी
माध्यमिक शाळांना अगोदर सुट्ट्या पडायच्या. 19 दिवस दिवाळीची
सुट्टी आहे.
सध्या सर्वांनाच दिवाळीचे
वेध लागले आहेत. व्यापारी मंडळी माल भरण्यात गर्क आहेत. काहींनी
माल भरून ग्राहकांची प्रतीक्षा सुरू केली आहे. दिवाळी सण हा प्रकाशाचा
आणि उत्साहाचा सण आहे. दिवाळीत जेवढे महत्त्व किल्ले,
आकाश कंदील, पणत्या, नवनवीन
कपडे यांना असते तितकेच महत्त्व असते दिवाळीच्या फराळाला. लाडू,
चकल्या, करंज्या, अनारसे,
शेव आणि खुसखुशीत असा खमंग चिवडा. दिवाळीच्या सुटीत
बाहेरगावाची पाहुणे मंडळी, शिक्षणासाठी परगावी असणारे मुले-मुली आपापल्या गावी परतत असतात. सगळे एकत्र आल्यावर गप्पांना
एक वेगळाच रंग चढतो आणि मग पोटासाठी छोटासा आधार म्हणून दिवाळीला फराळ बनवला जातो.
आपल्या संस्कृतीप्रमाणे पाहुण्यांसाठी विविध पदार्थ तयार केले जातात.
दिवाळी अवघ्या आठ दिवसांवर आल्याने महिला वर्गाची आपापल्या घरी दिवाळी
फराळाचे विविध पदार्थ बनवण्यासाठी लगबग सुरु झाली आहे.
No comments:
Post a Comment