Wednesday, October 24, 2018

कलावती गैरगोंड यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व अबाधित


जत,(प्रतिनिधी)-
मुचंडी जिल्हा परिषद मतदार संघाच्या काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या कलावती गैरगोंड (रा. कोळगेरी) यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व अखेर आबाधित राहिले. मुचंडी जिल्हा परिषद मतदार संघ हा इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव होता. येथून कोळगेरी (ता. जत) येथील कलावती गैरगोंड यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवून निवडणूक जिंकली होती. मात्र त्यांच्याकडे जातवैधता प्रमाणपत्र नव्हते. त्यासाठी त्यांना निवडणूक आयोगाकडून मुदत दिली होती. त्यांच्या विरोधातील भाजपच्या उमेदवार मंगल म्हाळापा पुजारी यांनी त्यांच्या विरोधात जातवैधता प्रमाणपत्र समितीकडे तक्रार दाखल केली होती.
कलावती गैरगोंड यांचा जातीचा हिंदू तेली हा दाखला चुकीचा असून त्यांनी सोबत जोडलेली कागदपत्रे खोटी आहेत म्हणून त्यांना जातवैधता प्रमाणपत्र देण्यात येऊ नये व त्यांची झालेली निवड रद्द करावी, अशी मागणी जिल्हा समितीकडे केली होती. त्या अनुषंगाने जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने पाहणी करून कलावती गैरगोंड यांचा सक्षम अधिकारी यांनी दिलेला जातीचा दाखला वैध असून विरोधकांनी दाखल केलेली तक्रार फेटाळून लावली.

No comments:

Post a Comment