Wednesday, October 24, 2018

कायद्याचा अभ्यास करूनच फिर्याद दाखल करा: मुख्यमंत्री


जत,(प्रतिनिधी)-
 गुन्हा सिध्दतेचे प्रमाण वाढून गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी पोलीस दलातील अधिकारी व कर्मचार्यांनी फिर्याद दाखल करून घेतानाच कायदा कलमांचा आभ्यास करून ती लावली पाहिजेत. गुन्ह्याचा तपास गुणवत्तापूर्ण करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगलीत स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस दलाच्या कामगिरीचा, जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि दोषींना शिक्षा लागण्याचा आलेखाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, गुन्ह्यांचा तपास होऊन गुन्हेगारांना शिक्षा होणे, चोरीला गेलेल्या गुन्ह्यात गुन्हेगार सापडून जनतेला त्यांच्या गेलेल्या वस्तू परत मिळणे यासाठी गुणवत्तापूर्ण तपास होणे आणि तपास यंत्रणेतील सर्व घटकांमध्ये सुयोग्य समन्वय असणे गरजेचे आहे.
पोलीस स्थानक पातळीवर याबाबत नियुक्त असलेल्या समितीचे मार्गदर्शन व मदत यासाठी होणे आवश्यक आहे. सामान्य जनांमध्ये पोलीस दलाप्रती विश्वास वृध्दिंगत होण्यासाठी पोलीस विभागामार्फत जनजागृतीचे विशेष प्रयत्न करायला हवेत. सरकारी वकील, पोलीस यंत्रणा, साक्षिदार, फिर्यादीमध्ये अनुषंगिक कायद्याच्या कलमांचा उल्लेख, फोरॉन्सिक लॅबकडील अहवाल या सर्व बाबींमध्ये योग्य समन्वयाने कार्य केले, तर गुन्हे सिध्द होऊन गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होण्याबरोबरच जनतेचाही पोलीस दलावरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होईल.

No comments:

Post a Comment