Thursday, October 25, 2018

शिक्षकच ठरणार शिक्षकांचे रोल मॉडेल


लोकसहभागातून शाळांचा कायापालट करण्यासाठी कार्यशाळा
जत,(प्रतिनिधी)-
जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढावी, लोकसहभागातून शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध करून जिल्हा परिषद शाळेकडे मुलांचा व पालकांचा कल वाढावा, यासाठी लोकसहभागातून चांगले काम उभारणार्या शिक्षकांची कार्यशाळा विलिंग्डन कॉलेजमध्ये घेण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी शिक्षकांना सविस्तर मार्गदर्शन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमातून इतर शिक्षकांना प्रोत्साहित करून जास्तीत जास्त शाळांचा चेहरा- मोहरा बदलण्याची चळवळ उभारली जाणार आहे. त्याची सुरवात कालपासून झाली. श्री. राऊत यांनी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद शाळांच्या दर्जाबाबत कितीही ओरड केली तरी अनेक शाळांचे काम चांगले आहे. काही शाळांमधील शिक्षकांनी लोकसहभागातून शाळांचा कायापालट केला आहे. याच शिक्षकांच्या कामाचा आदर्श समोर ठेवून इतर शिक्षकांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी हाती घेतला आहे. त्यासाठीच जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रातील लोकसहभागात चांगले काम केलेल्या शिक्षकास बोलावून कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा परिषद शाळांच्या प्रत्येक केंद्रातील एका शिक्षकाची या कार्यशाळेसाठी निवड करण्यात आली होती.
 या शिक्षकांपैकी प्रत्येक तालुक्यातील एका याप्रमाणे दहा शाळांचे सादरीकरण करण्यात आले. त्या 10 शाळाप्रमुखांचा सत्कारही करण्यात आला. यामध्ये त्या शाळेची आधीची स्थिती काय होती, लोकसहभागासाठी काय काय केले, लोकसहभाग कसा वाढवला, त्यामधून काय काय उपाययोजना केल्या, सध्याचे शाळेचे स्वरूप कसे आहे, शाळेचे रूपडे कसे पालटले, ही सर्व माहिती या सादरीकरातून मांडण्यात आली. हेच सादरीकरण आगामी काळात प्रत्येक केंद्र पातळीवर केले जाणार आहे. त्यासाठी तालुक्यांचीही अदलाबदल होऊ शकते. इतर शिक्षकांनी केलेल्या कामातून प्रोत्साहन मिळावे, त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी व आपआपल्या शाळेतही असे उपक्रम राबवावेत. त्यामुळे लोकसहभाग वाढेल व जिल्हा परिषद शाळेमध्येही मोठ्या प्रमाणावर भौतिक सुविधा उपलब्ध होतील, हा यामागचा उद्देश असल्याचे सीईओ राऊत यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक गटशिक्षणा- धिकारी प्रसाद कंदलगावकर यांनी केले. देशिंग शाळा नं 1 (ता कवठेमहांकाळ), नागेवाडी (ता. खानापूर), ढाकणेवाडी (ता. शिराळा), हिंगणगाव खुर्द (ता. कडेगाव), इस्लामपूर नं. 3 उर्दू शाळा, तुराईवस्ती (ता. जत), आंधळी (ता. पलूस), लक्ष्मीवाडी (ता. मिरज), कौठुळी (ता. आटपाडी) व हातनूर (ता. तासगाव) या शाळांनी प्रेझेंटेशन केले. प्राथमिक शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे, प्रशिक्षण केंद्राचे अधिव्याख्याता नामदेव माळी, कवठेमहांकाळ चे गटशिक्षणाधिकारी आर. जी. पाटील,जतचे शिक्षणविस्तार अधिकारी आर.डी. शिंदे यांनी मार्गदर्शन केले.





No comments:

Post a Comment