जतच्या बाजारात शुकशुकाट;व्यापार्यांची मात्र तयारी सुरू
जत,(प्रतिनिधी)-
दसर्याच्या धामधूमीनंतर
आता जतकरांना अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीचे वेध लागले आहेत.
वर्षातील सर्वात मोठा मानल्या जाणार्या या सणाचा
उत्साह एव्हाना वाढायला हवा होता,पण पावसाअभावी खरिप आणि रब्बीचा
हंगाम वाया गेल्याने आणि पाणीटंचाईची तीव्रता वाढल्याने यंदाच्या दुष्काळाचे सावट दिसून
येत आहे. बाजारात व्यापार्यांमध्येही अद्याप
उत्साह दिसून येत नाही.
जत शहरातले व्यापारी अंदाज
बघून दिवाळीची तयारी करताना दिसत आहे. दिवाळीच्या विविध साहित्याची खरेदी
करताना लोकांच्या मानसिकतेचा विचार केला जात आहे. कापड आणि खाद्य
पदार्थांच्या दुकानातून जेमतेम मालाची व्यवस्था करण्यावर भर दिसत आहे. दिवाळी साजरी केली जाईल,मात्र लोक हात आकडता घेतील,
असा अंदाज व्यक्त होत आहे. पगारदार लोकांकडूनच
खरी दिवाळी साजरी होईल, अशी अपेक्षाही काही व्यापार्यांनी व्यक्त केली. पगार वेळेवर झाले तर गर्दी होईल.
कारण यावर्षी सण पाच तारखेपासून सुरू आहे.
हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा सण हा दिवाळी असून सर्व सणात याला खूप मोठे महत्व
आहे. त्यामुळे हा सण मोठया उत्साहात साजरा करण्याकडे सर्वांचाच
कल असतो. तसेच हिंदू धर्मीयांबरोबरच अन्य धर्मीय लोकही तितक्याच
उत्साहात यात सहभागी होत या सणाचा आनंद लुटतात. सांगली जिल्ह्यात
काही दुष्काळी तालुके सोडले तर चांगला पाऊस झाल्याने तेथील परिस्थिती बरी आहे,मात्र जत,कवठेमहांकाळ, आटपाडी,
खानापूर या भागात पाऊस झाला नसल्याने शेतकर्यांमध्ये
उत्साह नाही. त्यातच अजून नोकरदारांचे बोनस,पगार झालेले नसल्याने, बाजारात शुकशुकाट आहे.
पण, आता अवघ्या दहा दिवसांवर दिवाळी येऊन ठेपल्याने
दिवाळीची खरेदीला हळूहळू जोर पकडेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
यंदा दिवाळीनिमित्त केली
जाणारी खरेदी पाहता यंदाही ग्राहकांकडून मोठया प्रमाणावर खरेदीला आळा बसण्याची शक्यता
आहे. कपडयांपासून ते खाद्यपदार्थांच्या दुकानांतून विविध साहित्यांची रेलचेल असते.
प्रतिवर्षी दिवाळीच्या साहित्य खरेदीसाठी मोठया प्रमाणावर झुंबड उडत
असते. यंदा त्याच्यावर परिणाम दिसणार आहे.
लोकांमध्ये उत्साह दिसून
येत नसला तरी व्यापारी लोक आपल्यापरीने दिवाळीची तयारी करत आहेत. ग्राहकांच्या
स्वागतासाठी मांडव घालणे, दुकानाला विद्युत रोषणाई करणे,
दीपावलीचा संदेश देणारी अक्षरे लावण्यात येऊन अनेक प्रकारांनी तयारी
सुरु आहे. ग्राहकांना प्रथमदर्शनीच खरेदी करण्याचा मोह झाला पाहीजे,
यासाठी काही प्रयत्न सुरू आहे. मात्र आणखी चार-पाच दिवसांत ग्राहक बाजाराकडे वळतील. आणि खरेदीला सुरुवात
होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
No comments:
Post a Comment