Wednesday, October 31, 2018

महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुकांसाठी मार्ग मोकळा


जत,(प्रतिनिधी)-
नवीन विद्यापीठ कायद्यात महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुकांची तरतूद होती. या महाविद्यालयीन निवडणुका कशा पद्धतीने घ्यावेत, त्याविषयीचे परिनियम राज्य शासनाने नुकतेच जाहीर केले. त्यानुसार येत्या 30 जुलैपूर्वी विद्यार्थी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे आवश्यक आहे. त्यामुळे आता महाविद्यालयीन निवडणुका घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे पुढच्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यायलीन निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नवीन विद्यापीठ कायदा अर्थात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 1 मार्च 2017 लागू झाला. यात विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या निर्णयात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने महाविद्यालय स्तरावर विद्यार्थी निवडणुका घेण्याची तरतूद करण्यात आली. मात्र या निवडणुकाविषयी काहीच स्पष्टता नव्हती. कोणत्या आधारावर व निकषावर निवडणुका घ्यायचा, असा प्रश्न प्राचार्यांनी उपस्थित केला होता. त्यासाठी आवश्यक असणारे परिनियमच राज्य शासनाने प्रसिद्ध न केल्याने यंदाच्या वर्षी निवडणुका होऊ शकल्या नाहीत. परिनियम विद्यापीठ व महाविद्यालयांना प्राप्त न झाल्याने विद्यार्थी निवडणुकांविषयी सर्वत्र साशंकता निर्माण होती. त्या पार्श्वभूमीवर आता उच्च शिक्षण विभागाने परिनियम जाहीर केले आहेत. त्यात निवडणुका घेण्याविषयीचे नियम, आचारसंहिता, पात्रता या सर्व बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. परिनियमात विद्यार्थी निवडणुकांच्या कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा संस्थेचे संचालक हे विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीसाठी प्राधिकारी असतील. ही निवडणूक मतपत्रिकेद्वारे होईल. कुलगुरूंशी विचारविनिमय विद्यार्थी निवडणुकीचा कार्यक्रम तयार करतील. यात निवडणुका घेणे, अधिसूचना काढणे, प्रसिद्धी आणि निवेदने यासंबंधीचा वेळापत्रक 31 जुलैपूर्वी जाहीर करणे आवश्यक आहे. ही सर्व निवडणुका प्रक्रिया 30 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे.
उच्च शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या नियमावलीानुसार आता शैक्षणिक संस्थांना विद्यार्थी निवडणुका घेणे सहज शक्य होणार आहे. विद्यापीठाच्या निर्णयप्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग होण्याच्या दृष्टीने ह्या निवडणुकांचा परिनियम प्रसिद्ध होणे ही बाब स्वागतार्ह आहे. त्याचबरोबर येत्या वर्षात महाविद्यालय निवडणुका होतील या दृष्टिकोनातून आवश्यक असणार्या सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्यात निवडणुकांमधून खर्या अर्थाने सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे नेतृत्व पुढे येईल,अशी प्रतिक्रिया विद्यार्थी संघटनांकडून मिळाली.

No comments:

Post a Comment