जत,(प्रतिनिधी)-
खासदार संजय पाटील यांच्याशी मतभेद झाल्यानंतर
भाजपाचे युवा नेते गोपीचंद पडोळकर त्यांनाच शह देण्याच्या प्रयत्नात असून श्री. पडोळकर यांनी सांगलीची लोकसभा निवडणूक लढवण्याच्यादृष्टीकोनातून
हालचाली सुरू केल्या आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील धनगर समाजाचे
श्रद्धास्थान असलेल्या श्री बिरोबाच्या म्हणजेच आरेवाडीच्या अंगणात घेतलेला दसरा मेळावा
यशस्वी झाल्यानंतर आत्मविश्वास बळावलेल्या श्री. पडोळकरांनी जिल्ह्यातल्या काही प्रमुख राजकीय लोकांच्या भेटीगाठी घेण्याचा
सपाटा लावला आहे. नुकतीच त्यांनी जनसुराज्य पक्षाचे नेते बसवराज
पाटील यांची भेट घेऊन आपला इरादा स्पष्ट केला आहे.
धनगर समाजाला आरक्षण मिळावे,यासाठी धडपड करीत असलेले युवा नेते गोपीचंद पडोळकर यांना
सध्या भाजपाने अडगळीत टाकल्याची चर्चा आहे. खासदार श्री.
पाटील यांच्याशी असलेले मतभेद अलिकडच्या काळात प्रकर्षाने पुढे आले आहेत.
भाजपामध्ये दखल घेतली जात नसल्याने पडोळकरांनी धनगर समाजाच्या जोरावर
सांगलीतून लोकसभा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आरेवाडीतील दसरा
मेळावा उठावदार झाला.
माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि माजी मंत्री अण्णा डांगे यांच्या मेळाव्यापेक्षा
पडोळकरांनी घेतलेल्या मेळाव्याची चर्चा अधिक होताना दिसत आहे. आरक्षण आंदोलनाचे राष्ट्रीय नेते हार्दिक पटेल यांच्या उपस्थितीत पार पडलेला
मेळावा यशस्वी झाल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. धनगर समाजाला
आरक्षण मिळवून दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा इरादा
स्पष्ट करत त्यांनी व्यासपीठ मिळवण्यासाठी लोकसभा निवडणूक पुढे ठेवली आहे. समाजातील लोकांना खासदार झालो तर आरक्षणाचा मुद्दा मांडताना बळ मिळेल,
हे सांगू शकतील. शिवाय सध्याची युवा पिढी त्यांच्या
डॅसिंग व्यक्तिमत्त्वाकडे आकर्षित झाली आहे. याचा लाभ त्यांना
मिळू शकतो.
श्री. पडोळकर यांनी लोकसभा लढविण्याचे निश्चित केल्यास खासदार
संजय पाटील यांनाच त्याचा धोका अधिक असणार आहे. त्यामुळे संजय
पाटील यांची भूमिका काय असणार आहे, याकडे साहजिकच सर्वांचे लक्ष
आहे. सध्या श्री. पडोळकर जिल्ह्याभर दौरे
काढत आहेत. जतच्या काही राजकीय मंडळींनी त्यांना जतमधून विधानसभा
लढविण्याची ऑफर दिली आहे. मात्र जतचा युवा वर्ग त्यांनी लोकसभाच
लढवावी, अशी भूमिका घेऊन आहे. शिवाय पडोळकरांना
विधानसभा लढवून त्यांचा इरादा साध्य करता येणार नाही. त्यामुळे
विधानसभा लढविण्याकडे त्यांचा कल असणार नाही. पडू किंवा पाडू
यापेक्षा त्यांनी जिंकण्यासाठीची व्यूहरचना आखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
सध्या खासदार यांच्यापुढे काँग्रेसकडून दमदार उमेदवार नाही. श्री. पडोळकर उभे राहिल्यास निवडणुकीत नक्कीच रंगत येणार
आहे.
श्री. पडोळकर शिवसेनेकडून लोकसभा लढवतील, अशी आणखी एक चर्चा
असली तरी वरच्या पातळीवर भाजप-सेनेची युती झाली तर मात्र त्यांची
गोची होणार आहे. त्यामुळे सध्या तरी ते स्वत:ची ताकद आजमवण्याचा प्रयत्न करीत आहेत. उद्या कदाचित
भारिपचे आंबेडकर यांचादेखील पर्याय असू शकतो.पण सध्या त्यांनी
जिल्ह्यातला पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न चालवला असल्याचे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment