Monday, October 29, 2018

लोकसहभागाने देश पाणीदार बनेल: डॉ. राजेंद्रसिंह


जत,(प्रतिनिधी)-
 देशात लोकसंख्येच्या प्रमाणात दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. मात्र त्या प्रमाणात पाणीसाठे वाढत नाहीत. अद्यापहीमला काय त्याचे,’ ही वृत्ती अनेकांच्या मनात आहे. भविष्यात हे पाण्याचे संकट टाळायचे असेल तर लोकसहभागानेच देश पाणीदार बनण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे मत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी नुकतेच सांगली येथे एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
विलिंग्डन महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमाला सुरू आहे,त्यात ते बोलत होते. महाविद्यालयाच्या वेलणकर सभागृहात जलसंवर्धन या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हनकर, किशोर पंडित, विलास चौथाई आदी उपस्थित होते. राजेंद्रसिंह राणा म्हणाले, पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवता आपण विधायक उपक्रम राबविणे गरजेचे आहे. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा नाश करणे योग्य नाही. राजस्थान येथे लोकसहभागाच्या मदतीने आम्ही हजारोजोहडम्हणजेच कच्चे तलाव, बंधारे निर्माण केले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी त्यात सामावले गेले. परिणामी परिसरातील दीड लाखांहून अधिक विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
लोकसंख्येमुळे पाण्याची मागणी वाढत जाणार आहे. परंतु आपण मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी धर्म आणि जातीच्या राजकारणात गुंतून पडत आहोत. समाजात विभागणी होत आहे. सर्व काही शासन करेल ही वृत्ती चुकीची आहे. समाज सुधारावा असे वाटत असेल तर त्याची सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. लोकसहभागातून राजस्थानातील बारा मृत नद्यांना आम्ही जिवंत केले आहे. आज त्याचा लाभ ग्रामस्थांनाच होत आहे. ’ग्लोबल वॉर्मिंगमध्येही वाढ होत चालली आहे. सध्या विकासाच्या नावाखाली जे काही प्रकल्प येत आहेत, त्यांच्या माध्यमातून खरंच विकास होतो की पर्यावरणाची हानी, यावर प्रत्येकाने शांतपणे विचार करणे गरजेचे आहे. दैनंदिन जीवनातही आपण पाण्याचा गैरवापर करण्यात आघाडीवर असतो. तो कोणत्याही परिस्थितीत रोखला पाहिजे. पाणी नियोजनाचे महत्त्व प्रत्येकाने समजून त्यानुसारच वाटचाल करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

No comments:

Post a Comment