जत,(प्रतिनिधी)-
गेल्या महिन्याभरापासून जत तालुक्यात पिण्याच्या
पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. 28 गावांनी गावाला पिण्याच्या
पाण्याचा टँकर सुरू करा, अशी लेखी मागणी महसूल विभागाला दिले
आहेत. पण तरीही प्रशासन चालढकल करीत आहे. साहजिकच लोकांमध्ये संताप व्यक्त होऊ लागला आहे. टँकर
देण्याचे आधिकार पूर्वीप्रमाणे तहसीलदारांना देण्यात यावेत, अशी
मागणी होऊ लागली आहे.
पूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याचे
अधिकार तहसीलदारांना होते. त्यामुळे संबंधित गाव-वाडी-वस्त्यांची पाहणी करून तहसीलदार टँकर सुरू करण्यासाठी
तत्काळ कार्यवाही करीत होते. मात्र सध्या हे अधिकार शासनाने जिल्हाधिकार्यांना प्रदान केले आहेत. यामुळे टँकर सुरू करण्याच्या
प्रक्रियेला उशीर होत आहे. त्यामुळे साहजिकच लोकांची पाण्यासाठी
भटकंती सुरू झाली आहे. सध्या तालुक्यातील 55 गावांमधल्या लोकांच्या दिवसांची सुरुवात फक्त म्हणजे फक्त पाणी भरण्याने होते.
सकाळचे दोन ते तीन तास पाणी भरण्यासाठी जातात.
जत तालुक्याला मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला
आहे.
वास्तविक तीव्र दुष्काळ जाहीर करून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याची
आवश्यकता होती.पण ती हालचाल अद्याप सुरू झालेली नाही.
जतच्या उजाड माळरानावर आता फक्त कुसळेच दिसत आहेत. त्यामुळे जनावरांची चार्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.
शेतकर्यांची चारा छावणी सुरू करण्याची मागणी केली
आहे. काही राजकेय पक्षांनी यासाठी मोर्चेदेखील काढले आहेत.
दुष्काळी परिस्थितीत पाणी आणि चार्याचा वापर शेतकर्यांनी काटकसरीने करावा यासाठी शेतकर्यांचे प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. पाणी जपून वापरले
तरच हा उन्हाळा सरणार आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकट करण्यासाठी
जलसंधारणाची कामे हाती घ्यावे लागणार
आहेत. मात्र प्रशासन अजून वरच्या आदेशाचीच
प्रतीक्षा करत आहेत. पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठी तहसीलदारांना
अधिकार दिल्यास लवकर कार्यवाही होऊन लोकांचे हाल कमी होण्यास मदत होनार आहे.
No comments:
Post a Comment