Saturday, October 27, 2018

चडचण एन्काऊंडरप्रकरणी 929 पानांचे आरोपपत्र दाखल

विजयपूर,(प्रतिनिधी)-
चडचणजवळील भीमा नदीच्या काठी झालेल्या धर्मराज चडचण याच्या बनावट एन्काउंटरप्रकरणी सीआयडी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले असून एकूण 16 आरोपी आहेत. 929 पानांचे हे आरोपपत्र तीन प्रकरणांचे आहे. इंडी येथील न्यायदंडाधिकारी कोर्टात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 30 ऑक्टोबर 2017 रोजी बनावट एन्काउंटर झाले व धर्मराज चडचण याचा खून करण्यात आला होता. त्याचा भाऊ गंगाधर चडचण याचाही गूढ मृत्यू झाला होता. दोन्ही मुलांना गमावलेल्या आईने, विमलाबाईने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चडचण पोलिसांना विनंती केली होती. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी गुलबर्ग्याच्या हायकोर्टात अर्ज देण्यात आला. त्यानंतर हायकोर्टाने या प्रकरणाचा तपास करण्याचा निर्णय दिला.      या प्रकरणातील तिसरा आरोपी सीपीआय असादे हा गेल्या सहा महिन्यापासून फरार होता. त्याला 3 दिवसांपूर्वी पकडण्यात आले. त्याची संपूर्ण चौकशी करुन हे आरोपपत्र दाखल करण्यात आले महादेव भैरगोंड, गोपाळ हल्लूर, एम.बी. असोदे, भीमाशंकर बिराजदार, शिवानंद बिराजदार, बाशासाब नदाफ, हणमंत पुजारी, सिदगोंड तिक्कुंडी, सिदगोंडप्पा मादवे, भीमाशंकर पुजारी, चांद चडचण, चंद्रशेखर जाधव, सिध्दारूढ रुगी, गड्डप्पा नायकोडी, सत्यगौडा पाटील, पुंडलिक बजंत्री अशा 16 जणांची नावे आरोपपत्रात आहेत. सीआयडीचे उपनिरीक्षक बसवराज अंगडी यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात आला. महादेव भैरगोंड हा प्रमुख आरोपी आहे. फौजदार गोपाळ हळकूर हा दुसरा मुख्य आरोपी आहे. सीपीआय एम.बी. असोदे हा तिसरा आरोपी आहे. अशा 16 आरोपींविरुध्द न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 





No comments:

Post a Comment