Monday, October 29, 2018

Time please:आयुष्य कठीण अजिबात नसते


आयुष्य कठीण अजिबात नसते. कधी नळाला पाणी नसते. कधी पाणी असून घोटभर देणारे कुणी नसते. कधी पगार झालेला नसतो. कधी झालेला पगार उरलेला नसतो. कधी मिळवलेला पगार कोणावर खर्च करायचा? प्रश्न सुटलेला नसतो. कधी जागा नसते. कधी जागा असून स्पेस नसते. कधी जागा आणि स्पेस दोन्ही असली तरी त्यात नात्याची उब नसते. कधी डब्यात आवडती भाजी नसते. कधी भाजी आवडली तर पोळीच करपलेली असते. दोन्हीही मनासारख्या असल्या तरी शेजारच्या डब्यातून येणार्या खमंग वासात आपली इच्छा अडकलेली असते. कधी कोणी सोबत असून एकटेपणा असतो. कधी कोणी सोबत नसतानाही उगाच भरल्या-भारावल्या सारखे वाटते. कधी काही शब्द कानावर पडतात. कधी नको ते शब्द कानावर आदळतात. कधी हव्या असलेल्या माणसांकडून नको ते आणि नको असलेल्या माणसांकडून अनपेक्षित अनुभव येतात. कधी आपण कसे वागायचे समजत नाही. कधी समोरचा असा
का वागतोय याचे उत्तर मिळत नाही. कधी दोष कोणाला द्यायचा समजत नाही. कधी आभार कोणाचे मानायचे उमजत नाही. कधी डोके टेकवायला जागा सापडत नाही. कधी जागा सापडलीच तर नमस्कार करायची इच्छा होत नाही. कधी कोठे रिजिड आणि कोठे फ्लेक्सिबल वागायचे हेच क्लिक होत नाही. कधी समोरचा/ची आपल्याला अकारण हक्काचा/ची वाटू लागते. कधी समोरच्याने आपल्यावर दाखवलेला हक्क आपल्याला नकोसा वाटू लागतो. कधी पैसा असला कि नात्यांच्या मोह होतो आणि नाती असली की त्यांच्या गरजा-मौज पूर्ण करता येत नाहीत म्हणून जीव हिरमुसतो. यात अजून 4-5 गोष्टी वाढवल्या तर मला सांगा याहून वेगळे आपण काय जगतो? ताण घेतला तर तणाव. आजचे भागले म्हणून आनंद आणि उद्याच काय म्हणून चिंता आयुष्य कठीण करते. आपण नदी सारखे जगावे. सतत वहात राहावे. या जन्मावर या जगण्यावर शत:दा प्रेम करावे.
 *****
कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करो, तुम्ही तुमचे कर्तव्य करीत चांगले काम करत रहा. नेहमी लक्षात ठेवा, लोक झोपेत असतात म्हणून सुर्य आपला विचार कधीही बदलत नाही. सुर्योदय होतोच.
 *****
एकदा पोलिस शिपायाची बायको त्याच्या टांगलेल्या वर्दीतून पैसे काढीत होती.
 शिपाई : तुझा नवरा जरी असलो तरी मी पोलीस आहे. माझ्या पाकिटातून पैसे चोरल्याबद्दल मी तुला अटक करू शकतो.
बायको : जाऊ द्या हो! हे घ्या दहा रुपये! प्रकरण वाढवू नका. इथेच मिटवून टाका.


No comments:

Post a Comment