Tuesday, October 30, 2018

पोलादी पुरुष - सरदार वल्लभभाई पटेल


आज सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती. पोलादी पुरुष म्हणून त्यांची भारतीय राजकारणात प्रतिमा आहे. गांधीजींच्या स्वदेशी चळवळीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. महात्मा गांधी यांच्या जवळचे सहकारी म्हणून सरदार पटेल स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर होते. कणखर बाण्याचे व्यक्तिमत्त्व असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांनी कणखर धोरणांचा अवलंब करून 565 संस्थानांचे विलिनीकरण करून एकसंध भारत उभा केला.
अशा या सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील नाडियाड इथे 31 ऑक्टोबर 1875 रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. आनंद हे त्यांचे गाव. जवळच असलेल्या करमसाद या गावी त्यांची वडिलार्जित शेती होती. झव्हेरीभाई हे त्यांचे वडील. या कुटुंबावर स्वातंत्र्य चळवळीचा प्रभाव होता. वडिलांनी 1857 च्या स्वातंत्र्ययुध्दात भाग घेतला होता. त्यामुळे वल्लभभाई यांच्यावर घरीच राजकीय संस्कार झाले होते. त्यांनी आपले वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आणि बोरसाड येथे वकिली सुरू केली. एक निष्णात वकील म्हणून त्यांचा अल्पावधीतच लौकिक झाला. वकिलीबरोबरच त्यांनी अहमदाबाद पालिकेची निवडणूक लढविली. तिथूनच त्यांचा राजकारण प्रवेश झाला.
महात्मा गांधी यांनी सक्तीच्या शेतकर्यांच्या शेतसारा वसुलीविरोधात हजारो शेतकर्यांची सत्याग्रहाची चळवळ सुरू केली. या चळवळीचे नेतृत्व सरदार पटेल यांच्याकडे सोपविले.सरदार पटेलांनी गुजरातच्या खेडा, बोरसद, बारडोली अशा 600 गावांतील हजारो सत्याग्रही शेतकरी बांधवांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुध्द अत्यंत निर्धाराने आंदोलन यशस्वी केले. यातूनच सरदार पटेल यांचे नेतृत्व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत उदयास आले आणि महात्मा गांधींच्या सहवासात ते वाढले, फुलले आणि एक कणखर, धाडसी नेता म्हणून लौकिकप्राप्त झाले. असहकार चळवळीत पंडित मोतीलाल नेहरू, सी. आर. दास, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, राज गोपालचार्य आणि चिंतामणी केळकर यांनी वकिलीचा त्याग केला. न्यायालयातील कामकाजावर  बहिष्कार टाकला. 1930 च्या सविनय कायदेभंग चळवळीत सरदार पटेल यांनी भाग घेतला म्हणून त्यांना अटक करण्यात आली. त्यांना पाच महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.
महात्मा गांधीच्या खांद्याला खांदा लावून सरदार पटेल यांनी सन 1942च्या चलेजाव आंदोलनात भाग घेतला. भारताचा राज्यकारभार पाहण्यासाठी काँग्रेस, मुस्लिम लीग या अन्य पक्षांशी चर्चा करून इंग्रज सरकारने हंगामी सरकार सप्टेंबर 1946 साली नियुक्त केले. या सरकारमध्ये सरदार वल्लभभाई पटेल गृहमंत्री होते. गृहमंत्री या नात्याने त्यांनी भारत-पाक फाळणीच्या चर्चेमध्ये निर्णायक भूमिका बजावली. त्यानंतर हिंदू-मुस्लिम यांच्यात उसळलेल्या प्रचंड जातीय दंगली आटोक्यात आणण्याचे अथक प्रयत्न केले. पाकिस्तानच्या आगळिकीविरुध्द जोरदार इशारा दिला. हिंदू आणि मुस्लिम यांच्याशी व्यवहारवादी भूमिकेतून संवाद साधून शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पटेल यांच्या बोलण्यात आणि कृतीत धर्मनिर्पेक्षता होती.
दरम्यान 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार पाहण्यासाठी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ अधिकारावर आले. या मंत्रिमंडळात सरदार वल्लभभाई पटेल उपपंतप्रधान झाले. सरदार पटेल यांनी तत्कालीन 565 संस्थानांचे स्वतंत्र भारतात विलिनीकरण करून एकसंध भारत निर्माण केला. त्यांच्या या कामगिरीने सरदार पटेल खर्या अर्थाने पोलादी पुरुष आहेत, हे इतिहाससिद्ध झाले. सरदार पटेल मनाने कणखर आणि विचारांचे पक्के होते, सच्चे होते. त्यामुळेच नेहरूंबरोबरच काय; पण गांधीबरोबरचे मतभेद व्यक्त करायलाही कचरत नसत. सरदार पटेलांचे स्वराज्यनिर्मितीबाबतचे स्वप्न असे होते की, स्वतंत्र भारतात कोणीही उपाशी राहणार नाही. राज्यकारभार आपल्या भाषेतच चालेल. काटकसरीने राज्य कारभार केल्यामुळे जनतेवर भीक मागण्याची वेळ येणार नाही. सैन्याचा वापर देशाचे रक्षण करण्यासाठीच केला जाईल. सर्वांना न्यायाने वागविले जाईल.

No comments:

Post a Comment