Wednesday, October 24, 2018

सिंचनाची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश


सांगलीत आढावा बैठक; ‘टंचाईशी सामना करण्यासाठी काटेकोर नियोजन करा
जत,(प्रतिनिधी)-
 टंचाईवर मात करण्यासाठी सर्व त्या उपाययोजना तात्काळ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी आम्ही जाहीर केलेल्या उपाययोजनांची अंमल- बजावणी केली जाईल. कोणतीही टंचाई भासू देणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे दिले. जिल्ह्यातील प्रथम अंदाजात पाच, तर दुसर्या पाच तालुक्यांचा समावेश झाला असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ आणि शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी तब्बल पाच तास जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महापालिका आणि कायदा व सुव्यवस्थेच्या मॅरेथॉन बैठका घेतल्या. यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयपाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जिल्ह्यातील 53 पाणी योजना पूर्णत्वास येत आहेत. 306 योजनांना मान्यता व निधी उपलब्ध करून दिला आहे. डिसेंबरपर्यंत सर्व योजनांच्या कामाचे कार्यारंभ आदेश दिले जातील, असे नियोजन करा आणि प्राधान्याने या योजना पूर्ण करा. त्यामुळे टंचाईसदृश परिस्थितीवर मात करणे शक्य होणार आहे. यासाठी शासनाकडे 100 टक्के निधी उपलब्ध आहे. त्यामुळे दुष्काळात टँकरने पाणी द्यावे लागू नये, यासाठी पिण्याच्या पाण्याच्या योजना गतीने पूर्ण करा. पाणीपुरवठा योजनांसाठी सौरउर्जेचा वापर करण्यात यावा. सिंचन योजनांचे चांगले काम झाले असून टेंभू योजनेचा सर्वाधिक फायदा सांगली जिल्ह्याला होणार आहे. या योजनेचा डिसेंबरपर्यंत चौथा टप्पा, तर मार्चपर्यंत पाचवा टप्पा पूर्ण करण्यात येईल.
जूनपर्यंत 25 हजार हेक्टर जमीन या योजनेतून, तर कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजनेतून 25 हजार हेक्टर अशी 50 हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचे नियोजन आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात 718 पैकी 477 विहिरींचे काम पूर्ण झाले आहे. ’मागेल त्याला शेततळेया योजनेला राज्यभरातून प्रतिसाद असून जिल्ह्यात 4945 कामे पूर्ण झाली आहेत. 98 टक्के जिओ टॅगिंंग करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी जमीन कठीण असल्याने अडचण येत असेल त्या ठिकाणी महात्मा गांधी राष्ट्रीयग्रामीण रोजगार हमी योजनेशी सांगड घालून ही कामे पूर्ण करून घ्यावीत, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात 5 लाख टन चारानिर्मिती जिल्ह्यात 13 लक्ष जनावरे असून यासाठी 29 लक्ष टन ओला अथवा 11 लाख वाळलेला चारा आवश्यक आहे. जिल्ह्यात सध्या 13 लक्ष टन चारा उपलब्ध असून जिल्ह्यात 2823 हेक्टर क्षेत्रात आफ्रिकन मका लागवडीव्दारे 5 लक्ष टन ओला चारा उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले.
जिल्ह्यात दुष्काळाची कळ क्रमांक 2 ही पाच तालुक्यात लागू झाली आहे. जिल्ह्यात संभाव्य टंचाई भासणार्या गावांची संख्या 323 असून या गरजेपैकी ताकारी, टेंभू, म्हैसाळ, आरफळ या योजनेच्या लाभक्षेत्रातून 200 गावातील पिण्याच्या पाण्याची गरज भागू शकेल. जलयुक्त शिवार अभियानातून 2018-19 मध्ये 2700 कामे समाविष्ट असून त्यापैकी 56 टक्के काम पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यात 732 किलोमीटरचे रस्ते करण्यात येणार असून 527 किलोमीटरच्या रस्त्यांना मान्यता देण्यात आली आहे. या योजनेतील अपूर्ण कामांच्या निविदा डिसेंबरपर्यंत पूर्ण करून पावसाळ्याआधी कामे पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले. ‘महाडीबीटीपायलट प्रोजेक्ट-अंतर्गत असणार्या विविध शिष्यवृत्ती योजनांबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या योजनेंतर्गत येणार्या अडचणी प्राधान्याने सोडवून पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज तात्काळ भरून घ्यावेत.
शिक्षण शुल्क योजना महाविद्यालयांच्या फायद्याची असून याबाबत कोणत्याही महाविद्यालयाचा बॅकलॉग राहणार नाही. संबंधित विभागाने याबाबत व्यक्तिश: पाठपुरावा करावा, असे निर्देशही त्यांनी दिले. मुद्रा योजनेमध्ये आतापर्यंत जिल्ह्यात 1500 कोटी कर्ज वितरण झाले असून 2 लाख 7 हजार 552 लाभार्थींना कर्ज उपलब्ध करून दिले आहे. या मधील लाभार्थीनिहाय यादी बँकांनी जिल्हा प्रशासनाला द्यावी, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी या योजनेच्या एकूण साध्याबाबत शासनामार्फत याचे सर्वंकष ऑडीट करण्यात येणार असल्याचे सांगितले.
 चांदोली पर्यटन विकासासाठी आवश्यक जागेचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने लवकर द्यावा, तो लवकर मार्गी लावण्यात येईल. जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनाही पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते सहाय्य करण्यात येईल. पर्जन्यमान, पीकपाणी यांच्यासह विविध प्राधान्यक्रमाच्या योजनांचा आढावा घेऊन सद्यः स्थिती जाणून घेतली. या बैठकीत जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उल्लेखनीय कामांची माहिती सादर करण्यात आली. यामध्ये केरळ आपत्तीग्रस्तांना मदत, जागतिक योगदिनी बालगाव येथे झालेल्या सूर्यनमस्कार कार्यक्रमाचीलिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसह जागतिक स्तरावरील विविध जागतिक रेकॉर्ड बुक्समध्ये घेण्यात आलेली नोंद, जिल्हाधिकारी कार्यालय व सर्व उपविभागीय कार्यालये आणि तहसील कार्यालये यांना प्राप्त झालेले आयएसओ मानांकन, अभिलेखे अद्ययावतीकरण, होप कार्यक्रम, गोल्डन अवर्स मेडिकल सर्व्हिस प, सद्भावना रॅली, दिव्यांगमित्र अभियान, नवमतदार नोंदणी अभियान, मराठा विद्यार्थी, विद्यार्थिनीसाठीची वसतिगृहे आदींचा समावेश होता.

No comments:

Post a Comment