Tuesday, October 23, 2018

जतसह जिल्ह्यातील 6 तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती


जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्यातील सहा तालुके दुष्काळसदृश जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, पलूस आणि कडेगाव या तालुक्यांचा समावेश आहे. मिरज पूर्व भागास दुष्काळाचे चटके बसत असतानाही वगळण्यात आले आहे, तर चांगला पाऊस झालेल्या पलूस आणि कडेगाव तालुक्याचा दुष्काळसदृशमध्ये समावेश करण्यात आला.याबाबत आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाण्याची शक्यता आहे.
सांगली जिल्ह्यात यंदा जिल्हा प्रशासनाकडून पेरण्या आणि पीक पाहणीचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला. पन्नासपेक्षा कमी आणेवारी असलेली तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, जत आणि आटपाडी तालुक्यांतील 246 गावांचा समावेश आहे. तो अहवाल शासनाला पाठविला आहे. पूर्व भागातील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर, तासगाव, मिरज पूर्व या भागात पावसाने पाठ फिरवली. पहिल्या टप्प्यात 32 जिल्ह्यातील 201 गावं दुष्काळसदृश जाहीर करण्यात आली आहे. आटपाडी, जत, कडेगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, पलूस आणि तासगाव तालुक्याचा समावेश आहे.
 शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळसदृश आटपाडी तालुक्यात सर्वात कमी 31 टक्के पाऊस झाला. जतमध्ये 56.75 टक्के, कवठेमहांकाळ 65.86, खानापूर 80.14, तासगाव 54.70, पलूस 92.26 आणि कडेगाव तालुक्यात 106.23 टक्के पावसाची सरासरी आहे. पहिल्या टप्प्यात शासनाकडून प्राथमिक अहवाल जाहीर करण्यात आला असून दुष्काळी परिस्थितीबाबत अंतिम अहवाल मिळाल्यानंतर 31 ऑक्टोंबरपर्यंत दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता आहे. चांगले पर्जन्यमान असलेले तालुक्यांचा समावेश; तसेच टंचाईचा सामना करावा लागणार्या मिरज पूर्व भागाचा समावेश नाही, त्यामुळे दुष्काळाची मदत नेमकी किती मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment