Wednesday, January 23, 2019

सांगली जिल्ह्यात 92 बालके अतितीव्र कुपोषित;832 उंबरठ्यावर

जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्यातील पाच वर्षापर्यंतच्या एक लाख ३९ हजार ६३९ बालकांपैकी ९२ बालके अतितीव्र कुपोषित असल्याचे आढळले. याशिवाय ८३२ बालके कुपोषणाच्या उंबरठ्यावर आहेत.

    एकात्मिक बाल विकास विभागामार्फत दर महिन्याला शून्य ते ६ वयोगटातील बालकांच्या वजनाची तपासणी केली जाते. जिल्ह्यातील एक लाख ३९ हजार ६३९ बालकांची वजने घेतली होती. यामध्ये तीव्र कुपोषित ९२ बालके आढळून आली आहेत. कुपोषित बालकांसाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून ग्राम बालविकास केंद्राच्या माध्यमातून दिवसातून आठवेळा आहार दिला जात आहे. परंतु बालकांमध्ये सुधारणा झालेली नसल्याचे आढळून आले.
दरम्यान, ९२ कुपोषित बालक साधारण श्रेणीत येण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारीच बालकांना दत्तक घेणार आहेत. त्या बालकांच्या आहारापासून वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कुपोषणाच्या उंबरठ्यावर असलेल्या बालकांचीही संख्या ऊस पट्ट्यातच सर्वाधिक आहे. कमी वजनाच्या चार हजार ४४ आणि तीव्र कमी वजनाच्या ५०१ बालकांचा समावेश आहे. या बालकांच्या आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज असून, वेळेवर पोषक आहार देण्याची गरज आहे.
सधन तालुक्यांमध्ये स्थिती गंभीर
वाळवा तालुक्यामध्ये २६, पलूस व खानापूर तालुक्यात प्रत्येकी १२, मिरज तालुक्यात आठ तीव्र कुपोषित बालकांची संख्या आहे. आकडेवारी पाहता, सधन तालुक्यातच कुपोषित बालकांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून येत आहे. यावरून येथील पालकांचे बालकांच्या आहाराकडे फारसे गांभीर्याने लक्ष असल्याचे दिसत नाही.

No comments:

Post a Comment