Saturday, January 26, 2019

जि.प.शाळेत शिकलेली भावंडे सी.ए. परीक्षा उत्तीर्ण



जत,(प्रतिनिधी)-
    आज पालकांच्या डोक्यात इंग्रजी माध्यामाचेच खूळ बसले आहे. पैसे कितीही जाऊ द्या,पण आपल्या मुलाने इंग्रजी शाळेतच शिकले पाहिजे,असा अट्टाहास करताना पालक दिसतात. मात्र जिल्हा परिषदेच्य आणि तेही ग्रामीण भागात शिकलेल्या मुलांनी आपल्या कष्टाच्या,जिददी च्या जोरावर अत्यंत अवघड समजली जाणारी सीए ची परीक्षा उत्तीर्ण होऊन एक वेगळीच वाट आजच्या तरुणांना आणि त्यांच्या पालकांना घालून दिली आहे. जत तालुक्यातील वाळेखिंडी या गावची नेहा आणि निरंजन या भावंडांनी सीए परीक्षा उत्तीर्ण होऊन एक आदर्श निर्माण केला आहे.

सध्या सर्वत्र इंग्लिश मेडियम शाळेचे जबरदस्त आकर्षण आहे.मुलांचा बौद्धिक , शारीरिक आणि सामाजिक विकास मातृभाषेतूनच होतो असे शिक्षण तज्ज्ञ सांगत असले तरी पालक ते फारसे मनावर घेताना दिसत नाहीत. नेहा आणि निरंजन या दोघांनीही आता पालकांना वेगळा विचार करायला भाग पाडले आहे. या दोघांचे प्राथमिक शिक्षण गावातल्याच जिल्हा परिषद शाळेत झाले. माधामिक शिक्षणही मराठी माध्यमातून झाले. दहावीला ९३% व ९६% मार्क मिळूनही सी.ए. होण्याचे एकच उद्दिष्ट समोर ठेवून कॉमर्स शाखेत प्रवेश घेतला. आणि दोघेही आज सी.ए. आहेत. नेहा हिने  मे २०१६ साली तर निरंजन यांनी नोव्हेंबर २०१८ च्या परीक्षेत सी.ए.परीक्षा उत्तीर्ण होऊन सर्व मुलांना एक वेगळी वाट दाखवून दिली आहे. या सर्व यशात त्यांचे वडील रघुनाथ दिगंबर शिंदे ,आई सौ. नंदाताई ,सर्व शिक्षक गुरुवर्य यांचे अनमोल सहकार्य व मार्गदर्शन लाभले. या मुलांचे वडील सध्या जत पंचायत समितीकडे शिक्षण विभागात शिक्षण विस्ताराधिकारी आहेत.आज जत मधील अनेक मुले-मुली त्यांचे मार्गदर्शन घेवून अनुकरण करताना दिसत आहेत.
   सी.ए.परीक्षा उत्तीर्ण होणे हे बहुजन समाजातील विद्यार्थ्यासाठी स्वप्नवत वाटत असले तरी कठोर परिश्रम केले तर यशाला पर्याय नाही हे दोघांनीही सिद्ध केले आहे. इंग्लिश मेडियम मधून शिक्षण म्हणजेच भविष्यातील यशाचा पाया असे ज्या पालकांना वाटते आणि प्राथमिक शिक्षणासाठी आपल्या मुलावर लाखो रुपये खर्च करतात अशा पालकांनी शांतपणे विचार करावा आणि मुलाचा शारीरिक, बौद्धिक,मानसिक अशा सर्वांगीण विकासासाठी जाणीवपूर्वक आत्मचिंतन करून निर्णय घ्यावा असे वाटते.

No comments:

Post a Comment