Monday, January 14, 2019

येळवीत लांडोर पक्ष्याचा तलावातील गाळात पाय अडकल्याने मृत्यू


जत,(प्रतिनिधी)-
 येळवी (ता. जत) येथे पाणी व अन्नासाठी भटकंती करणार्या लांडोर या पक्ष्याच्या येळवी तलावातील गाळात पाय रुतल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत माहिती अशी येळवी तलाव पूर्णपणे एक महिन्यापूर्वी कोरडे पडलेले आहे. भीषण पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. या तलावालगत 20 हेक्टरवर वनक्षेत्र आहे. या वनात वनप्राणी, पशुपक्ष्यांचा वावर असतो. शुक्रवारी दुपारी या तलावात गाळ वाहतूक करणार्या ट्रॅक्टर चालकाने अगदी एका डबक्यात (थोडेसे पाणी असणार्या) ठिकाणी लांडोर या पक्ष्याचा पाण्यासाठी तडफडून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.

याबाबत वनविभागास माहिती दिली असता वनपाल शकील मुजावर व वनसंरक्षक हणमंत वगरे यांनी लांडोर या पक्ष्याचा पंचनामा केला. जत पशुवैद्यकीय कार्यालयातून शवविच्छेदन करून घेतले. या पोस्टमार्टम अहवालात पाणी व अन्नामूळे व्याकूळ, कासवीस होऊन मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. वन्यजीव प्राणी पशु-पक्ष्यांचे जीवित धोक्यात पाण्याअभावी दुर्मिळ जंगली जीवांचे मात्र अतोनात हाल सुरू आहेत. पोटात भडकलेली भूक आणि तहान शमविण्याकरिता अन्नपाण्याच्या शोधार्थ वणवण भटकंती करणार्या निष्पाप जंगली जीवाचा असा करुण अंत मनाला चटका लावणारा ठरला आहे.
अशा दुर्मिळ जीवांचे जतन करण्याकरिता पाणी व्यवस्था शासनाने करणे गरजेचे आहे.सहा महिन्यांपूर्वी काराजनगी (ता.जत) येथे ही शेततळ्यात नाग जोडी अडकली होती. परंतु वनविभागास या नागजोडीस वाचविण्यात यश आले. तदनंतर खैराव (ता. जत) येथेही काळविटाचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता.दोन महिन्यांपूर्वी येळवी येथील विहिरीत पाण्यासाठी भटकरणार्या कोल्हाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. वाळेखिंडी येथे विहिरीत कोल्हा पडला होता. याकरिता पशुप्रेमींनी देखील पुढाकार घ्यावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.

No comments:

Post a Comment