जत,(प्रतिनिधी)-
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी आज (दि.27) सकाळी बिळूरच्या शिवारात दाखल झाले.गेल्या दोन दिवसांपासून बिळूर आणि परिसरातील लोक पाण्याची प्रतीक्षा करत होते. पाणी आल्यावर लोकांनी अक्षरशः आनंदोत्सव साजरा केला.
खासदार संजय पाटील आणि आमदार विलासराव जगताप यांनी आठ दिवसांपूर्वी बिळूर परिसरात कृष्णेचे पाणी आणण्याचे आश्वासन दिले होते. सध्या या योजनेची कामेदेखील जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. गेल्या चार दिवसांपासून खासदार पाटील आणि आमदार जगताप यांनी पाणी योजनेच्या कामाच्या उद्घाटनाचा धडाकाच लावला आहे. अगदी जतच्या पूर्वेच्या शेवटच्या टोकाला म्हणजेच उमदीपर्यंत पाणी आणण्याचे नियोजन आहे. तशा पद्धतीने नियोजनही करण्यात आले आहे. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जतच्या सर्वच भागात पाणी नेण्याचे नियोजन आहे.त्याप्रमाणे त्याचे नियोजन झाले आहे.
जतच्या सर्व भागात म्हैसाळ योजनेचे पाणी खेळत असताना जतच्या दक्षिण भागात मात्र याबाबत काहीच नियोजन दिसत नव्हते. त्यामुळे या भागातील विविध संस्थाचे पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्ते यांनी खासदार संजय पाटील यांची भेट घेतली होती. त्यांनी त्यावेळी त्यांना आठ दिवसांत बिळूर शिवारात पाणी आणण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आश्वासनाची पूर्तता झाल्याने शेतकरी आणि लोकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. पंचायत समिती सदस्य रामाणा जिवाणावर,सोसायटी चेअरमन बसगोंडा जाबगोंड आणि संरपच नागु पाटील हे यासाठी सातत्याने झटत होते. रात्रंदिवस त्यांचे कामाच्या ठिकाणी हेलपाटे सुरू होते. आता बिळूर शिवारात पाणी दाखल झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, खलाटी, येळदरी परिसरात पाट फोडण्याचा प्रकार सुरू असल्याने पाणी बिळूर परिसरात येण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र या शेतकऱ्यांना थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याला लवकरच यश येईल, असे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment