राज्यपाल सी. विद्यासागर राव
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील पाण्यावाचून वंचित 42 गावांना वरदान ठरणाऱ्या कर्नाटकातील तुबची- बबलेश्वर उपसा सिंचन योजनेतून तातडीने पाणी देण्यासंदर्भात तोडगा काढू, अशी ग्वाही देऊन याप्रश्नी लवकरच दोन्ही राज्यांची बैठक बोलवू, अशी माहिती महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिली.
जत तालुक्याच्या सीमेवर आलेल्या तुबची- बबलेश्वर उपसा सिंचन योजनेचे पाणी पूर्व भागातील 42 गावांना मिळावे साठी सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती तम्मनगौडा रवी पाटील यांनी मोठा जोर लावला आहे. रविवारी भाजपा नेत्या निताताई केळकर यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यातील पदाधिकारी यांनी मुंबईत राज्यपाल भवन मध्ये राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. यावेळी येरळा सोसायटीचे नारायण देशपांडे, ऍड.श्रीपाद अष्टेकर जि.प. अध्यक्ष संग्राम देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शिष्टमंडळाने राज्यपाल विद्यासागर राव यांना तूबची -बबलेश्वर पाणी योजनेचा सविस्तर कृती आराखडा सादर करून योजनेची माहिती दिली. यावेळी राज्यपालांशी बोलताना रवी पाटील म्हणाले, कर्नाटक सरकारने राबवलेल्या तुबची योजनेचे पाणी जत तालुक्याच्या सीमेवर आले आहे , शिवाय आज वर महाराष्ट्र सरकार दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये कर्नाटकला सतत कृष्णा नदीतून पाणी देत आहे. आजमितीस महाराष्ट्राने कर्नाटकला आठ टीएमसी पाणी दिले आहे , पण कर्नाटक सरकार कडून सीमाभागात कधीही पाणी सोडण्यात आले नाही.
दरम्यान, यंदा जत तालुक्यावर दुष्काळाची छाया गडद आहे. तालुक्यात पाण्याची आणीबाणी निर्माण झाली आहे. अशा स्थितीत दोन्ही राज्यांनी माणुसकीच्या भावनेतून एकमेकांना आधार दिला पाहिजे. जतला तुबची योजनेतून दोन टीएमसी पाणी मिळावे म्हणून आम्ही गेल्या दोन महिन्यापासून सतत पाठपुरावा करीत आहोत.
त्या अनुषंगाने कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , पाटबंधारे मंत्री गिरीष महाजन यांची भेट घेतली आहे, दोन्हीही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि पाटबंधारे मंत्री यांनी या योजनेसाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे, परंतु हा प्रश्न तातडीने सोडवायचा झाल्यास कर्नाटक- महाराष्ट्र असा पाणी वाटपाचा आंतरराज्य करार होणे आवश्यक आहे. यासंदर्भात राज्यपाल म्हणून आपण पुढाकार घ्यावा, अशी विनंती श्री.रवी पाटील यांनी राज्यपालांकडे केली आहे.
लवकरच तोडगा काढणार
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी जतच्या शिष्टमंडळाचे सगळे म्हणणे ऐकून घेतले, अर्धा तास या योजनेवर त्यांनी गांभीर्याने सविस्तर चर्चा केली. यावेळी शिष्टमंडळाशी बोलताना राज्यपाल विद्यासागर राव म्हणाले , जत तालुक्यातील 42 गावांना पाणी देण्यासाठी सरकारचा दुवा म्हणून निश्चितच तोडगा काढू. तसेच कर्नाटक महाराष्ट्र असा आंतरराज्य करार करण्यासाठी दोन्ही राज्यांची बैठक बोलावून यासंदर्भात लगेचच पत्रव्यवहार करणार असल्याचे विद्यासागर राव यांनी सांगितले. दरम्यान, राज्यपाल यांनी जत संदर्भात घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे पूर्व भागातील 42 गावांना तुबची योजनेचे पाणी मिळण्याच्या आशा आणखीन बलकत झाल्या आहेत.
No comments:
Post a Comment