जत तालुक्याचा पूर्वभाग: कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्याच्या पूर्वभागात खुलेआम गावठी (हातभट्टीच्या) दारूचे धंदे सुरू
असून अवैध धंद्यामुळे तरुण पिढी वाया चालली आहे..या अवैध धंद्यांना
लवकरात लवकर आळा घालावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
जत तालुक्यात सर्वच भागात अवैध दारू
धंद्याची बरकत झाली असून पूर्वभागात तर प्रत्येक गावात गावठी दारूचे अड्डे फोफावले
आहेत. या परिसरात हा धंदा राजरोस व निर्भयपणे सुरू असल्याचे
चित्र दिसत आहे. याला राजकीय पाठबळ मिळत असल्याने या अवैध धंद्यांना
रोखणार तरी कोण, असा प्रश्न उपस्थित होत
आहे.
गावठी दारू धंद्यांवर कारवाई व्हावी, गावठी दारू तयार होऊच नये, गावठी दारूधंदे बंद करणे व
ते पुन्हा सुरू होणार नाहीत.बेकायदेशीर दारू उत्पादन व विक्री
होऊ नये,ही जबाबदारी उत्पादन शुल्क विभागाची असल्याने याकडे उत्पादन
शुल्क विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.
यासाठी उत्पादन शुल्क विभागाने पोलिसांची
मदत घेऊन कारवाई करणे अपेक्षित आहे. सरकारमान्य
देशी दारूची दुकाने सकाळी दहानंतरच उघडली जातात.मात्र गावठी दारू
पहाटेपासूनच सर्वत्र उपलब्ध होते. त्यांच्यावर वेळेचे बंधन व
अंकुश नाही. या धंद्यावर पोलिसांनी कारवाई केली असल्याचे दाखवले
जाते,मात्र पुन्हा त्याच ठिकाणी राजरोसपणे गावठी दारूची विक्री
होत असल्याचे दिसून येते. हे अड्डे कधीच बंद होत नाहीत.
जत तालुक्यात सर्वत्र ठिकठिकाणी अवैध
धंदे बोकाळले आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार
उदध्वस्त होऊ लागले आहेत.हे धंदे बंद करण्याची मागणी होत आहे.
हॉटेल व ढाब्यांवर मिळणार्या देशी-विदेशी दारूच्याबाबतीत तर प्रश्नचिन्हच आहे.कारण हुबळीमेड बनावट दारूचा या भागात सुळसुळाट असल्याचे बोलले जात आहे.
या मुळे युवा पिढी बरबाद होत आहे.त्याचबरोबर अनेक
कारणांमुळे गुन्हेगारीही फोफावत चालली आहे. अवैध धंद्यांबरोबरच
मटका, अवैध वाहतूक, चंदन तस्करी,
गांजा लागवड आणि विक्री देखील वाढली आहे. या सर्वच
अवैध धंद्यांना आळा घालणे मोठे आव्हान आहे.
No comments:
Post a Comment