Wednesday, January 23, 2019

शिक्षकांसाठी तीन दिवसांची स्तराधारीत अध्ययन कार्यशाळा संपन्न


जत,(प्रतिनिधी)-
सहावी ते आठवी इयत्तेत पायाभूत परीक्षेत मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी 60 दिवसांचा स्तराधारीत अध्ययन कार्यक्रम (एलबीएल) राबवण्यात येत असून याबाबतची मुख्याध्यापक, शिक्षकांसाठीची तीन दिवसांची कार्यशाळा नुकतीच जत येथील सिद्धार्थ पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये पार पडली. या कार्यशाळेनंतर शाळा पातळीवर शैक्षणिक गुणवत्तेत मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी 60 दिवसांचा विशेष कार्यक्रम राबवला जाणार आहे.

जत तालुक्यातील मराठीचे अध्यापन करणार्या सुमारे 150 शिक्षकांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. जत तालुक्यात सुमारे तीन हजाराच्या आसपास विद्यार्थी पायाभूत पातळीवर मागे आहेत. त्यांना प्रवाहात आणण्यासाठी हा कार्यक्रम पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रात 34 जिल्ह्यांत प्रत्येकी एका तालुक्यात हा कार्यक्रम पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवण्यात येत असून यासंबंधीचे पहिले प्रशिक्षण संगमनेर (जि. अहमदनगर) याठिकाणी पार पडले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील विद्यार्थ्यांची सद्यस्थिती जाणून घेऊन त्यांना असलेली स्तराधारीत कार्यक्रमाची गरज आणि उपयुक्तता लक्षात उपक्रम राबवला जाणार आहे. त्यांच्या वयाची परिपक्वता लक्षात घेऊन जरा वेगाने कसे शिकवायचे ,वेगवेगळ्या गटातील विद्यार्थ्यांचे वेगवेगळे नियोजन कसे करायचे, याची कल्पना या कार्यशाळेतून देण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रमुख सुरेंद्र सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर बेले, पारेकर, वैशाली माने, विशाल चिपडे, श्री. ऐवळे, अहादेव गडीकर, जयवंत वळवी, रतन जगताप यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याते आण्णासाहेब बळवंत, अन्नपूर्णा माळी, गटशिक्षणाधिकारी बी.एन.जगधने, विस्ताराधिकारी आर.डी.शिंदे, तानाजी गवारी यांनीही शिक्षकांना मार्गदर्शन केले. सिद्धार्थ पॉलिटेक्निकचे प्राचार्य श्री. वाघमारे यांचेही विशेष सहकार्य लाभले.



No comments:

Post a Comment