Wednesday, January 16, 2019

मराठी हीसंस्काराची भाषा-डॉ.दिनकर कुटे

जत,(प्रतिनिधी)-
ज्ञानेश्वर पासून ते आजपर्यंत मराठी साहित्याने अनेक पिढ्यांना संस्कारीत केले आहे. मराठी भाषेत मधुरता आणि गोडवा ओतप्रोत भरलेला आहे. मराठी भाषा ही संस्काराची भाषा आहे,म्हणून मराठी माणसाने मराठी भाषेचे अध्ययन केले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. दिनकर कुटे यांनी केले.

            ते दिवाणी व फौजदारी न्यायालय, जत येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे सह.न्यायाधीश शिरीषकुमार वाघमारे होते. यावेळी बार असोसिएशनचे साजिद सौदागर  यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
आज मराठी भाषेकडे दुर्लक्ष केल्यामुळे समाजामध्ये नैतिक मुल्यांची घसरण होत आहे. येणाऱ्या पिढ्यांवर संस्कार करावयाचे असतील तर मराठी भाषेशिवाय पर्याय नाही. मराठी ही  ज्ञानभाषा आणि व्यवहारभाषा झाली पाहिजे, असेही ते  शेवटी म्हणाले.
      अध्यक्षस्थानावरून बोलताना सह.न्यायाधीश शिरीषकुमार वाघमारे म्हणाले कि, मराठी भाषा मराठी ही अमराठी भाषिकांमध्ये रुजणे गरजेचे आहे. मराठी भाषेचे संवर्धन व्हायचे असेल तर ती लोक चळवळ झाली पाहिजे. साजिद सौदागर यांनी न्यायालयीन कामकाजात मराठीचा वापर कसा करावा हे अनेक उदाहरणाच्या साह्याने स्पष्ट  केले.कार्यक्रमाचे  प्रास्ताविक आणि आभार  प्रदर्शन एम.एस. गुर्नहसूर यांनी आणि सूत्रसंचालन संतोष पाठक यांनी मांडले.

No comments:

Post a Comment