Thursday, January 31, 2019

दुष्काळामुळे दुग्ध व्यवसाय आर्थिक अडचणीत

जत,(प्रतिनिधी)-
सध्या निर्माण झालेल्या दुष्काळाच्या सर्वाधिक झळा दुग्ध व्यवसायाला बसत आहेत. पाण्याविना जनावरांच्या चार्‍याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असल्याने सर्वच प्रकारच्या चार्‍यांचे भाव कडाडले आहेत. कडब्याच्या एका पेंढीचा दर तब्बल 15 ते 22 रूपयांवर गेला आहे. कडवळ, मकवान, उसाचे वाडे आदींच्या एका पेंढीचा दर 4 ते 5 रूपये झाला आहे. चार्‍यांचे भाव वाढले असतानाच दुधाचे दर मात्र किरकोळच आहेत. त्यामुळे दुग्ध व्यवसाय प्रचंड आर्थिक अडचणीत असून आगामीकाळात तर या व्यवसायाचा प्रवास आणखीनच खडतर होणार आहे, हे निश्‍चित.

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकरी दुग्ध व्यवसाय करीत आहेत. जत तालुक्यांमध्ये तर दुग्ध व्यवसाय हाच प्रमुख व्यवसाय म्हणून करणार्‍यांची संख्याही लक्षणीय आहे. परंतु दुधाचे दर कोसळल्याने दुग्ध व्यवसाय सातत्याने अडचणीत येत आहे. त्यात सध्या जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडला आहे. सध्या फेब्रुवारी महिना सुरू असतानाही पाण्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम दुग्ध व्यवसायावर झाला आहे. कारण पाण्याविना सर्वच प्रकारच्या चार्‍यांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे चार्‍याचे दर प्रचंड वाढले आहेत.
हिरव्या चार्‍यामध्ये या दिवसात मकवण, कडवळची बाजारामध्ये मोठी आवक असते. त्यामुळे याचे दिर स्थिर असतात. परंतु यंदा दुष्काळामुळे या चार्‍यांची आवक कमालीची घटली आहे. परिणामी या चार्‍यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. कडवळ, मकवण यांच्या एका पेंढीचा दर 4 ते 5 रूपये आहे. तोच मागच्या वर्षी 3 रूपयांवर नव्हता. अशीच स्थिती उसाच्या वाड्याची झाली आहे. मागच्या वर्षी 70 ते 100 रूपये शेकडा असणारे वाडे यंदाच्या वर्षी 500 रूपये शेकड्यापर्यंत गेले आहेत.
कडब्याला सोन्याचे मोल
वर्षभर सुका चारा म्हणून ज्वारीच्या कडब्याचा उपयोग होतो. शिवाय हा चारा अत्यंत पौष्टिक आणि दुभत्या जनावरांसाठी गरजेचा आहे. त्याचबरोबर वर्षभर खराब न होणारा सुका चारा असल्याने कडब्याला दुग्ध व्यावसायिकांकडून प्रचंड मागणी आहे. परंतु यंदा ज्वारीच्या पेरणीतच प्रचंड घट झाल्याने बाजारामध्ये नवीन कडबा येणे अवघड आहे. त्यामुळे आमागीकाळात तर कडबा अत्यंत महागणार आहे. हेच ओळखून अनेक दुग्ध व्यावसायिक जुना कडबाच खरेदी करण्याच्या मागे लागले आहेत. परिणामी आता कडब्याच्या किंमती वाढल्या आहेत. सध्या 1 हजार 200 रूपये क्विंटल, तर तब्बल 2 हजार ते आडीच हजार रूपये शेकडा कडब्याच्या किंमती आहेत. येणार्‍या काळात कडब्याला सोन्याचे मोल येणार असल्याचे पशुपालकांकडून सांगितले जात आहे.
दुष्काळात दुधाचा पूर
ज्या तुलनेत चार्‍याच्या किंमती वाढल्या आहेत त्या तुलनेत दुधाच्या दरामध्ये वाढ होणे अपेक्षित असताना उलट दुधाचे दर घसरले आहेत. कारण याच मोसमामध्ये दुभत्या जनावरांची संख्या अधिक असते. ती यंदाही आहे. त्यामुळेच दुष्काळात सध्या दुधाचा पूर आला आहे. त्यामुळे खुल्या बाजारामध्ये दूध कट्ट्यावर म्हशीच्या दुधाला 30 रुपये लिटरपर्यंत दर मिळत आहेत. गायीच्या दुधाला 20 रुपये लिटर दर मिळत आहे. दूध डेअरीमध्येही याचप्रमाणात दुधाचे दर आहेत.
खुराकही महागला
चार्‍याप्रमाणेच जनावरांच्या खुराकामध्येही वाढ झाली आहे. किरकोळ बाजारामध्ये सरकी 25 रूपये किलो, गव्हाची तांब 20 रूपये, तर काळना 25 रूपये किलो झाले आहे. त्याचबरोबर कडब्याच्या कुट्टीची एक भोद 700 रूपयाला आहे.

No comments:

Post a Comment