(जत तालुक्यात पिण्याच्या पाण्याची भीषणता वाढली असून शाळकरी मुलांनाही पाण्यासाठी भटकावे लागत आहे. शेडयाळ ता. जत येथील शाळकरी मुले तीन किमी अंतरावरून पाणी आणत आहेत.) |
जत,( प्रतिनिधी)-
जत तालुक्यामध्ये पाणीटंचाईची भीषण तीव्रता जाणवत असताना प्रशासनाकडून या गोष्टीची दखल न घेतल्याचे चित्र समोर येत आहे. जत तालुक्यामध्ये 118 गावांचा समावेश असून भौगोलिकदृष्ट्या जत तालुक्याचा विचार करता पश्चिम भागातील 20 गावे वगळता इतर भागांमध्ये शेतकरी हा दुष्काळाच्या सावटाखाली मेटाकुटीला आलेला आहे.
विशेषत: चाराटंचाई, पाणीटंचाई व शेतमजुरांच्या हाताला काम हे प्रश्न अधिक तीव्र झालेले आहेत. पाणीटंचाईचा प्रश्न अधिक गंभीर झालेला असताना दूध व्यवसायावर त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आहे. एकवेळ गावातील नागरिक, महिला, लहान मुले पाण्यासाठी आपल्या शिवारातील ज्या विहिरींना व बोअरला पाणी आहे अशाठिकाणी हातामध्ये भांडी घेऊन पिण्याच्या पाण्याचा शोध घेऊन आपली तहान भागवताना दिसतात. मात्र मुक्या जनावरांना पिण्यासाठी पाणीच उपलब्ध होत नसल्यामुळे मुक्या जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे.
घरासमोर हजारो रूपये किंमतीची दुभती जनावरे केवळ त्यांना पाणी पाजण्यासाठी शेतकर्यांकडे पाण्याची सोय नसल्यामुळे व त्यांना गव्हाणीमध्ये चारा टाकण्यासाठी चारा उपलब्ध नसल्यामुळे या जनावरांना कवडीमोल किंमतीला शेतकर्यांना खाटकाच्या दावणीला बांधण्याची वेळ आली आहे. जत परिसरामध्ये बकर्यांचा आणि मोठ्या जनावरांचा बाजार हा जत आणि माडग्याळ याठिकाणी मोठ्या प्रमाणात भरतो. या बाजारामध्ये जत तालुक्यातील शेतकरी आपल्याकडील दुभती जनावरे पण केवळ पाणी व चारा नसल्यामुळे कवडीमोल किंमतीला बाजारात विकून जड अंत:करणाने आपल्या गावाकडे, आपल्या वस्तीवर, आपल्या जनावरांच्या गोठ्याकडे येताना दिसत आहेत.
जत तालुका हा शासनाने दुष्काळी तालुका म्हणून जाहीर केला खरा मात्र शासनाची गत म्हणजे ‘बोलाचाच भात व बोलाचीच कढी’ अशाचप्रकारची झाल्याचे शेतकरी बोलताना दिसत आहेत. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शासनाने एक तर त्वरित टँकरने पाणी पुरवणे, चारा छावण्या सुरू करणे अशा प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे होते. मात्र चारा छावण्यांमध्ये भ्रष्टाचार होतो म्हणून आम्ही थेट शेतकर्र्यांंच्या खात्यावर जनावरे जगवण्यासाठी अनुदान देणार, अशी वल्गना शासनाच्या दरबारामध्ये काम करणार्या काही पदाधिकार्यांकडून खासगीमध्ये करण्यात आली. मात्र या सरकारने आतापर्यंत जनावरे जगवण्यासाठी ना चारा छावण्या सुरू केल्या ना शेतकर्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याचे काम केले. त्यामुळे ‘दोन्ही घरचा पाहुणा उपाशी’ या वाक्यप्रचाराच्या अर्थाप्रमाणे आतापर्यंत शेतकर्यांच्या हातावर शासनाकडून तुरी ठेवण्याचे काम केलेले आहे.
सध्या जानेवारी महिना सुरू असताना आताच जमिनीतील पाण्याची पातळी 800 फुटापेक्षा खोलवर गेल्याचे दृश्य सर्वत्र या भागात आहे. आणखीन जून महिना येण्यासाठी सहा महिने अवधी असताना पाणीटंचाईची दाहकता दिवसेंदिवस अधिक वाढवणारी आहे. सध्या पाण्यासाठी ग्रामीण भागातील जनता सर्वत्र भटकंती करत असताना यावर ठोस असा उपाय शासनाकडून करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पुढील सहा महिन्यांच्या टंचाईकाळातील दिवसांचा विचार करता मूलभूत समस्यांकडे शासनाने गांभीर्याने पाहावे, अशी रास्त मागणी जत तालुक्यातील शेतकरीवर्गाकडून केली जात आहे.
No comments:
Post a Comment