Wednesday, January 30, 2019

जतमध्ये बेशिस्त चालकांमुळे वाहतुकीचा खेळखंडोबा


जत,(प्रतिनिधी)-
जत शहराचा विस्तार मोठ्या झपाट्याने होत आहे. मात्र त्याचबरोबर अनेक समस्यांनीही शहराला ग्रासले आहे. पोलिस प्रशासनची बघ्याची भूमिका संशयास्पद आहे. वास्तविक हा प्रश्न मार्गी लावून रहदारी सुरळीत करण्याची आवश्यकता आहे. मात्र वाहतुकीचा प्रश्न जैसे थे आहे. शिवाय पोलिसांच्या उदासिनतेमुळे शहराला बेशिस्त वाहनचालकांचे ग्रहण लागले आहे. त्यातून शहरातील वाहतुकीचा खोळंबा कायम आहे.

जत शहरात कसल्याच प्रकारची पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे सध्या शहराला अवैध पार्किंगचा विळखा पडलेला दिसतो आहे. शहराची लोकसंख्या जवळपास पन्नास हजाराच्या आसपास पोहचली आहे.काही ठिकाणी अपवाद वगळता घरोघरी दोन-तीन दुचाकी वाहने आहेत. यामुळे दुचाकी वाहनांची संख्या काही लाखांच्या घरात पोहचली आहे. त्याचबरोबर चारचाकी वाहनांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसभर तर वाहतूक व्यवस्था विस्कळीत असतेच, शिवाय संध्याकाळी गल्लोगल्ल्यादेखील वाहनांच्या गर्दीने फुललेल्या असतात.वाहने कशीही लावलेली असतात.
जत शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी,यासाठी वाहतूक पोलिसांची व्यवस्था असली तरी त्यांना वास्तविक ते कुठे आहेत,याचा शोध घ्यावा लागतो. ते भलतीकडेच कुठे तरी आपली वाहतूक व्यवस्था पार पाडत असतात. जत शहरातील स्मशानभूमी ते बसवेश्वर चौक हा सातारा-विजापूर मार्ग सतत गर्दीने फुललेला असतो. वाहनचालकांच्या मुजोरपणामुळे या मार्गावरून जाताना लोकांना मोठी कसरत करावी लागत असते. त्याचबरोबर मंगळवार पेठ, लोखंडी पूल,सोलनकर चौक, उमराणी रोड, निगडी कॉर्नर या परिसरात वाहतुकीचा खेळखंडोबा झालेला असतो. मंगळवार पेठेत तर कापड दुकाने,किराणा, खते, इतर दुकाने,बँका यांची गर्दी असतानाच बँक ऑफ इंडिया परिसरात भाजीपाला बाजारही थाटलेला आहे. त्यामुळे लोकांना या भागातून प्रवास करणं कमालीचं जिकरीचं झालं आहे. याचा फायदा चोरटे घेत असून पैसे, मोबाईल हातोहात लांबवले जात आहेत.
या भागात वाहने पार्क करायला व्यवस्थाच नसल्याने कुठेही ती पार्किंगला लावली जात असल्याने वाहतुकीचा सतत खोळंबा होत असतो. काही महाभाग रस्त्यावरच दुचाकी लावून बाजार करायला किंवा चहा प्यायला निघून जातात. पोलिस या भागात फिरून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा अजिबात प्रयत्न करीत नाहीत. वाहतूक सुरळीत करण्याबाबत एक-दोनदा बैठका झाल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे, पोलिस चौकी उभारण्याची मागणी होते, त्याबाबत कार्यवाही करू असे आश्वासन मिळते आणि पुन्हा सर्वकाही थंड होते. लोकांना मात्र नेहमीप्रमाणे त्रासाला तोंड द्यावे लागते.
खरे तर शहरात वाहनतळाची आवश्यकता आहे. मात्र याबाबत नगरपालिका फारसे मनावर घ्यायला तयार नाही.त्यामुळे वाहतूक व्यवस्था सतत खोळंबलेली असते. वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे त्यात आणखीनच भर पडत चालली आहे. त्यामुळे जत शहराची वाहतूक व्यवस्था सुधारणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.



No comments:

Post a Comment