दुष्काळी स्थिती हाताळण्यात अपयश
जत,(प्रतिनिधी)-
तालुक्यातील दुष्काळ 1972 पेक्षाही भीषण आहे. दिवसेंदिवस त्याची दाहकता वाढतच चालली आहे. मात्र आमदार विलासराव जगताप केवळ बैठका घेण्यातच धन्यता मानत आहेत. त्यांनी बैठकांचा फार्स बंद करावा. अन्यथा जनता भाजपला धडा शिकवेल, असा इशारा जिल्हा बँकेचे संचालक, काँग्रेसनेते विक्रम सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिला.
ते म्हणाले, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह आमदार जगताप यांनी आतापर्यंत फक्त बैठका घेतल्या. पण त्या बैठकांतून काहीच निष्पन्न झालेले नाही. तालुक्यातील 44 गावांत टँकरची मागणी वाढते आहे. प्रत्यक्षात अवघे 19 टँकर सुरू करण्यात आले आहेत. एका गावाला एक टँकर देण्यात आला आहे. तो पाणीपुरवठा अपुरा आहे. माणशी 20 लिटरप्रमाणे पाणी देण्याचे कोणतेही नियोजन नाही.
कृषी राज्यमंत्री खोत आणि जगताप यांनी आतापर्यंत ज्या बैठका घेतल्या त्यातून नेमके काय निष्पन्न झाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, आमदार जगताप यांची प्रशासनावर पकड राहिलेली नाही. गल्ली ते दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे, असे सांगणार्या आमदार जगताप व त्यांच्या समर्थकांना उपोषणाचा फार्स करावा लागतो, हा दुर्दैवी व हास्यास्पद प्रकार आहे. म्हैसाळ योजनेच्या पाण्याने तालुक्यातील सर्व तलाव आतापर्यंत भरून घेणे आवश्यक होते. परंतु जगताप यांना तेही जमले नाही, असा टोला सावंत यांनी
लगावला.
पालकमंत्र्यांचे साफ दुर्लक्ष सावंत म्हणाले, तालुक्यात दुष्काळाने जनता हैराण झाली आहे.पशुधन संकटात सापडले आहे.पाणीटंचाई, चारा टंचाई तीव्र झाली आहे. पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी तालुक्यात दुष्काळ निवारणासाठी यापूर्वीच प्रयत्न करणे गरजेचे होते. प्रत्यक्षात ते तालुक्यात फिरकले देखील नाहीत.
No comments:
Post a Comment