Tuesday, January 8, 2019

राजे रामराव महाविद्यालयात राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात सुरू

जत,(प्रतिनिधी )
      राजे रामराव महाविद्यालयात गौरवशाली अशी क्रीडा परंपरा आहे . या महाविद्यालयाच्या अनेक खेळाडूंनी देश पातळीवर आपला वेगळा ठसा    उमटविला आहे. मात्र शासन क्रीडा क्षेत्राला म्हणावा तसा निधी देत नाही. पण राजे रामराव महाविद्यालयाने खिलाडू वृत्ती जोपासून देश पातळीवर क्रीडा क्षेत्रात आपले नाव कोरले आहे, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विक्रम दादा सावंत यांनी केले.


       ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दी वर्ष व राजे रामराव महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे या होत्या. प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे यांनी आपल्या प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेचा आढावा घेऊन महाविद्यालय सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त राबवत असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.
             यावेळी अध्यक्षस्थानावरून  बोलताना संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे म्हणाल्या कि, विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा क्षेत्राच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था क्रीडा क्षेत्रासाठी नेहमीच अग्रेसर असते. संस्थेमधील सर्वच खेळाडूंना उच्च दर्जाचे क्रीडा साहित्त्य विद्यार्थ्यांना मिळवून देत असते. राजे रामराव महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्राला दैदिप्यमान अशी महान परंपरा आहे असे सांगून सचिवा शुभांगी गावडे पुढे म्हणाल्या कि, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दी महोत्सव व राजे रामराव महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उदघाटन होत आहे. याचा मला आनंद आहे. महाविद्यालयाने अशीच क्रीडा परंपरा चालू ठेवावी,  संस्था कधीही खेळाच्या बाबतीत कमी पडणार नाही असेही  त्या शेवटी म्हणाल्या
       प्रारंभी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व श्रीमंत रामराव महाराज यांच्या पुतळ्याचे  पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी  संस्थेच्या तेरा जिल्ह्यातून विविध संघ सहभागी झाले आहेत. या राज्यस्तरीय स्पर्धा दोन दिवस चालणार असून या स्पर्धेचे नियोजन प्रा. सिद्राम चव्हाण, क्रीडा  संचालक प्रा. श्रीमंत ठोंबरे, कनिष्ठ विभागाचे क्रीडा संचालक प्रा. दीपक कांबळे यांनी केले.

No comments:

Post a Comment