Saturday, January 19, 2019

संखला दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करा: सुशीला होनमोरे

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्याच्या पूर्व भागातील लोकांच्या सोयीसाठी संख येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात आले आहे, मात्र या ठिकाणी विविध किरकोळ  दाखले सोडले तर काहीच उपलब्ध होत नाही. उलट लोकांचा त्रास वाढला असून दाखल्यांच्या पूर्ततेसाठी जतला मग पुन्हा संख असा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे लोकांची सोय होण्याऐवजी मोठी गैरसोय होत आहे. संखला दुय्यम निबंधक कार्यालय सुरू केल्यास बहुतांश सोयी ची पूर्तता होणार आहे. त्यामुळे संखला दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुशीला होनमोरे यांनी महसूल मंत्र्यांकडे केली आहे.

जत तालुक्याचा विस्तार पाहता लोकांच्या सोयीसाठी सततच्या पाठपुराव्याने संख येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाला आता वर्ष पूर्ण झाले असले तरी अजूनही 75 टक्के कामासाठी लोकांना जतलाच जावे लागत आहे. फक्त 25 टक्के कामे ही या अप्पर तहसील कार्यालयात होतात. उत्पन्न व रहिवासी व जातीचे दाखले संखला मिळतात. पण जातीच्या किंवा जात पडताळणीच्या कामासाठी लागणारी मुद्रांके मिळवण्यासाठी लोकांना जतलाच खेटे घालावे लागतात. मुद्रांक (स्टॅम्प) खरेदीसाठी लोकांना जतला येऊन पुन्हा प्रतिज्ञापत्र करण्यासाठी संखला जावे लागते. उमदी, उटगीसारख्या गावातील लोकांना शंभर रुपयांच्या मुद्रांकसाठी दोनशे रुपये आणि दोन दिवस घालवावे लागतात. यात पैशाचा आणि वेळेचा अपव्यय होत आहे. या अप्पर तहसील कार्यालयाचा काय लाभ, अशी प्रतिक्रिया पूर्व भागातील लोकांकडून येत आहे.
संख येथे दुय्यम निबंधक कार्यालय सुरू केल्यास खरेदी -विक्रीचे दस्त याच भागात होण्यास मदत होऊन लोकांची मोठी सोय होणार आहे. शिवाय इतर कामासाठी किंवा प्रतिज्ञापत्रासाठी  लोकांना जतला हेलपाटे घालावे लागणार नाहीत. त्यामुळे संख येथे दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी श्रीमती होनमोरे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment