Wednesday, January 16, 2019

घोषणांचा पाऊस; अंमलबजावणीचा दुष्काळ!

जत,(प्रतिनिधी)-
संपूर्ण पावसाळ्यात पावसाने अवकृपा दाखविल्यामुळे आजवर न पडलेला दुष्काळ यंदा जत तालुक्यात  पडला आहे. याचवेळी मात्र सरकारकडून दुष्काळी उपाययोजनांच्या घोषणांचा पाऊस पाडला जात आहे. प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणीचाच दुष्काळ असल्याचे चित्र अनुभवायला येत आहे.  उन्हाचा तडाका जसा  वाढत आहे, तशाच दुष्काळाच्या झळादेखील तीव्र होत आहेत. यातून  स्वतः ला वाचण्यासाठी शेतकरी सरकारच्या मदतीकडे आशा लावून बसले आहेत.

     दमदार पावसाने यावर्षीच्या पावसाळ्याला  सुरूवात होईल असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले होते, त्यामुळे उत्साहात शेतकर्‍यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या. त्यामुळे  तालुक्यात खरीप पेरण्या झाल्या. मात्र जुलै महिन्यापासून पाऊस गायब झाला तो परत आलाच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास 90 टक्के खरीप वाया गेला तसेच पावसाविना रब्बीच्या केवळ 24 टक्केच पेरण्या होऊ शकल्या. जे पेरले त्यातलेही बरेच उगवले नाही. खरीप आणि रब्बी हे दोन्ही हंगाम वाया गेल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आले आहेत. जिरायतदार शेतकर्‍यांची ही स्थिती असतानाच पाण्याविना बागायतदार शेतकर्‍यांचीही अवस्था वरचेवर वाईट होऊ लागली आहे. जत तालुक्यात सातत्याने दुष्काळी स्थिती निर्माण होत आहे. याचा थेट परिणाम जिल्ह्यातील भूजल पातळीवर झाला आहे. यंदाच्या वर्षी याचे परिणाम प्रकर्षाने जाणवत आहेत. कारण सध्या जानेवारी महिना सुरू असूनदेखील जवळपास  तालुक्यांतील  सर्वच विहिरींनी तळ गाठला आहे, तर बोअरवेल बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत.  त्यामुळे शेतीच्या पाण्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. याचा फटका फळबागायतदार शेतकर्‍यांना बसत आहे. या अस्मानी संकटातून बाहेर पडण्यासाठी तालुक्यातील  शेतकरी सरकारच्या मदतीकडे आशा लावून आहेत. परंतु सरकारकडून सध्यातरी दुष्काळी संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना बाहेर काढण्याच्यादृष्टीने काही ठोस हालचाली सुरू असल्याचे दिसून येत नाही. राज्य सरकार दुष्काळी उपायोजनांसाठी केंद्र सरकारच्या मदतीकडे आशाळभूतपणे पाहात आहे. परंतु केंद्र सरकारपर्यंत महाराष्ट्रातील दुष्काळाच्या झळा पोहोचल्या की नाहीत, हाच खरा कळीचा प्रश्‍न शेतकर्‍यांमधून विचारला जात आहे.  या दुष्काळी परिस्थितीची पाहणी केंद्रीय पथकाने केली खरी पण हे पथक जत तालुक्याकडे फिरकलेच नाही. तालुक्यात  भीषण दुष्काळ असल्याचा अहवाल प्रशासनाने शासनास दिलेला आहे. हा सगळा सोपस्कार झाल्यानंतर तरी तालुक्यात दुष्काळ निवारण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे, परंतु तसे होत नसल्याची ओरड जनतेतून होत आहे.

No comments:

Post a Comment