जत,(प्रतिनिधी)-
शासनाने शिक्षक भरती प्रक्रिया सुरू केली असली तरी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण होत नाही,तोपर्यंत त्यांना खात्री वाटत नाही.त्यामुळे डी. एड.,बी. एड. धारक अस्वस्थ झाले आहेत. या मंडळींना नोकर भरती आचार संहितेत अडकणार का,अशी भीती वाटू लागली आहे.
जवळपास दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शिक्षक भरती प्रक्रियेस अखेर शासनाने सुरुवात केली. यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षक म्हणून नोकरी करण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. प्रथम टीईटी त्यानंतर अभियोग्यता चाचणी असे टप्पे ठेवूनही तरुणांनी परिश्रम घेत दोन्ही परीक्षेत आपली गुणवत्ता सिध्द केली होती. केवळ दोन-तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येणारी शिक्षक भरती प्रक्रिया अद्यापही लटकलेलीच आहे. मराठा समाजाला मिळालेले आरक्षण, त्यानंतर बिंदूनामावली अद्ययावत करण्यासाठी वाढविलेली मुदतवाढ आणि त्यानंतर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या १० टक्के आरक्षणाच्या मुद्द्याबरोबरच राज्यातील अनेक जिल्हा परिषदेने अजूनही बिंदूनामावली अद्ययावत केली नसल्याने शिक्षक भरती नक्की कधी होणार? हे कोणीही सांगू शकत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर शिक्षक भरतीकडे टक लावून बसलेल्या डी. एड्., बी. एड्.धारकांचा वारंवार अपेक्षाभंग होत आहे. २८ हजार, २४ हजार आणि त्यानंतर १८ हजार अशी शिक्षकांच्या भरतीची संख्या कमीच होत असल्याने तरुणांत अस्वस्थता वाढत आहे. याचा राग सोशल मीडियावरून उमेदवार व्यक्त करत आहेत. भरतीसाठी राज्यातून १ लाख ९७ हजार ५२0 उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यातील १ लाख २१ हजार उमेदवार पात्र ठरले आहेत. आता यापैकी १५ टक्के उमेदवारांनाच नोकरीचा लाभ मिळण्याची चिन्हे आहेत.
त्यामुळे उर्वरित उमेदवारांमध्ये नैराश्य येण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment