जत,(प्रतिनिधी)-
मनावरचा ताण सारे गम पध नि सा या सप्तस्वराने निघून जातो. सांस्कृतिक समृद्धी आली की मनाची समृद्धी येते. मन विकासाच्या दिशेने जाण्यासाठी सांस्कृतिक समृद्धी महत्वाची आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे यांनी केले.
ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दी वर्ष व राजे रामराव महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय युवक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयीन विकास समितीच्या सदस्या श्रीमंत जोत्स्नाराजे डफळे या होत्या प्रारंभी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व श्रीमंत रामराव महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन श्रीमंत जोस्त्नाराजे डफळे यांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन महत्वाचे असते. विविध कलागुणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होत असतो असे सांगून प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे पुढे म्हणाले कि, कला हि मानवाच्या जीवनात समृद्धी निर्माण करुन समाजाला विचार देण्याचे काम करीत असते. कलेच्या माध्यमातून रसिकांच्या मनाची मशागत होत असते. आणि मनाची मशागत झाली की विचारांचे पिक अमाप येते म्हणून अशा सांस्कृतिक कार्यक्रमाची गरज आहे असे ते शेवटी म्हणाले.
प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात प्रा. बाबासाहेब बेंडेपाटील जिल्हास्तरीय युवामहोत्सवाचा उद्देश सांगितला. यावेळी स्वामी विवेकानंद सप्ताहनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सी. वाय. मानेपाटील यांनी तर शेवटी आभारप्रदर्शन प्रा. कुमार इंगळे यांनी केले या युवक महोत्सवाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. आर. बी. पाटील, प्रा.सौ.एन.व्ही.मोरे, प्रा. युवराज शिंदे, प्रा. अफताब खतीब, प्रा. दिनेश वसावे यांनी केले.
No comments:
Post a Comment