जंगल वाचवा - निसर्ग वाचवा,
पर्यावरणाचा बचाव करा, असा प्रबोधनपर संदेश देत
पाच जणांची टीम 16 जानेवारी रोजी मालगाव (ता. मिरज) येथून झारखंड राज्यातील
शिखरजीपर्यंत सायकल फेरी काढणार आहे. विशेष म्हणजे या सायकल फेरी
पथकाचे प्रमुख एक शासकीय अधिकारी आहेत. शासकीय अधिकारीपदाची झूल
काही काळ बाजूला ठेवून ते आपल्या चार साथीदारांसह ‘सेव्ह फॉरेस्ट’
मोहिमेवर जात आहेत.
प्रकाश शेडबाळे (सध्या रा.
पुणे) हे मिरजेचे सुपुत्र आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये उच्चपदावर असलेल्या शेडबाळे यांनी
फॉरेस्ट अभियान छेडले आहे. शेडबाळे यांनी आपल्या चार मित्रांना
सोबत घेऊन अभियानाची मुहूर्तमेढ रोवली. तीन वर्षांपूर्वी या टीमने
फॉरेस्ट अभियानांतर्गत पुणे-मुंबई अशी पहिली सायकल फेरी काढली.
त्यानंतर पुणे -शिर्डी, त्यानंतर
पुण्यापासून श्रवणबेळगोळपर्यंत (कर्नाटक) सायकल रपेट केली. या अभियानामध्ये या टीमने सायकल वापरा
पर्यावरण जगवा, जंगल वाचवा प्रदूषण रोखा, असे समाजप्रबोधनपर संदेश फेरीत दिले. यंदा या टीमचे सायकल
मोहिमेचे चौथे वर्ष आहे. यंदा मिरज तालुक्यातील मालगावपासून झारखंड
राज्यातील मधुबन शिखरजीपर्यंतचा टापू सायकल फेरीत पादाक्रांत केला जाणार आहे.
हे अंतर दोन हजार तीनशे किलोमीटर आहे. 16 जानेवारीला
सुरू होणारी मोहीम 31 जानेवारीला मधुबन शिखरजी येथे थांबणार आहे.
मालगाव, मिरज, सांगली,
बाहुबली, सातारा, पुणे,
नगर, औरंगाबाद, लोणार,
करंजिया, वर्धा, नागपूर,
भंडारा, राजनंदगाव, पिठोरा,
संबलपूर, आंबा, जुनी रांची,
गिरिडीहमार्गे मधुबनला ही रॅली दाखल होणार आहे.
चार राज्यांतून
आणि 21 जिल्ह्यातून सेव्ह फॉरेस्ट अभियानचा संदेश देणारी सायकल
फेरीची मोहीम जाणार आहे. प्रकाश शेडबाळे हे स्वतः शासकीय अधिकारी
आहेत. त्यांच्या टीममधील चौघेजण व्यावसायिक आहेत. ही पाच जणांची टीम गेली तीन वर्षे सामाजिक जबाबदारी मानून स्वयंप्रेरणेने मोहिमा
काढत आहे. एकीकडे वनविभाग आणि सामाजिक वनीकरण यांचे झाडे लावा-झाडे जगवा-जंगल वाचवा असे अभियान फसत असलेले दिसून येत
आहे. अशा वेळी जंगलामध्ये उच्चपदावर असलेल्या शेडबाळे यांच्यासारख्या
शासकीय अधिकार्याने जंगल वाचवण्यासाठी, निसर्ग व पर्यावरण संवर्धनासाठी पदरमोड करून सायकल मोहीम हाती घेण्याच्या उपक्रमाने
सर्वांसमोरच आदर्श ठेवला आहे. प्रकाश शेडबाळे चार सवंगड्यांबरोबर
सेव्ह फॉरेस्ट अभियान राबवण्यासाठी हजार हजार किलोमीटर दूरवर फिरतात. लोकांना प्रबोधनपर संदेश देतात, जनजागृती करतात ही विधायक
बाब सगळ्यांनीच अनुकरण करावी, अशी आहे. शेडबाळे यांच्यासोबत त्यांचे बंधू प्रकाश शेडबाळे, सुदिन
खोत, संजय नाईक, धनंजय शेडबाळे,
अविनाश भोकरे, धन्यकुमार चिंचवडे हे सहभागी होणार
आहेत. या सर्वांचे मार्गदर्शक अजित पाटील हे आहेत.
No comments:
Post a Comment