Tuesday, January 15, 2019

गटबाजी आणि पडोळकरांच्या विरोधकाच्या भूमिकेमुळे भाजप अडचणीत



जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यामध्ये लोकसभेचे पडघम आतापासूनच वाजू लागले असून काँग्रेस कोमात, तर भाजप जोमात, असे चित्र पाहायला मिळत असले तरी भाजपमध्ये पडलेल्या दोन गटाने भाजप अडचणीत असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्याचबरोबर गोपीचंद पडळकर यांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपला अडचणीचे होऊ शकते, असे सध्या तरी चित्र दिसत आहे.

 भाजपतर्फे विद्यमान खासदार संजय पाटील यांना उमेदवारी मिळेल, हे निश्चित असल्याने त्यांचे कार्यकर्ते जोरदारपणे कामाला लागले आहेत. परंतु काँग्रेसतर्फे उमेदवार अद्याप निश्चित झाला नसल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते चिंतेत आहेत व जत तालुक्याचे नेते विक्रम सावंत त्यांच्याव्यतिरिक्त कुठल्याही नेत्याचे जनसंपर्क जत तालुक्यात नाही. त्यामुळे तालुक्यात काँग्रेस कार्यकर्ते आहेत मात्र नेते नाहीत, अशी स्थिती आहे. सध्या काँग्रेसतर्फे विशाल पाटील यांच्या चर्चा असून त्यांच्याबरोबर माजी मंत्री प्रतीक पाटील, पृथ्वीराज पाटील,  शैलजा पाटील, डॉ. पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजीत कदम यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे. खासदार संजय पाटील यांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहिलेले गोपीचंद पडोळकर यांची भूमिकादेखील या निवडणुकीत महत्त्वाची राहणार आहे. त्यांचा जिल्ह्यात धनगर समाजात जनसंपर्क दांडगा असून त्यांनी तालुक्यांबरोबर गावोगावीदेखील कार्यकर्त्यांच्या बैठका घ्यायला सुरुवात केली आहे.
जत तालुक्यामध्ये गत निवडणुकीमध्ये आमदार विलासराव जगताप यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये असूनही भाजपचे उमेदवार खासदार संजय पाटील यांना मदत केली होती. त्यामुळे जत मधून काँग्रेस उमेदवारापेक्षा 10 हजार मताने मताधिक्य दिले होते. सध्याचे चित्र पाहताम्हैसाळ पाणी उपसा सिंचन योजनेला मिळालेल्या गतीने जत पश्चिम व दक्षिणकडील मतदार जाम खूश आहे. तसेच जत तालुक्यात रस्यांची कामेदेखील सुरू आहेत. याचा लाभ भाजपा उमेदवाराला होऊ शकतो. यापंचवार्षिकमध्ये खासदार संजय पाटील हे सतत कार्यक्रम, उद्घाटन, काही समारंभाला हजेरी लावत सतत संपर्कात आहेत. याउलट गतवेळचे काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांचा संपर्क मात्र फारच नगण्य पाहावयास मिळाला. खासदार पाटील यांना त्यांचा जनसंपर्कच तारू शकेल, असे चित्र सध्या दिसत आहे.
जत तालुक्यात भाजपमध्ये सध्या दोन गट पडले आहेत. एक गट महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संलग्न आहे, तर आमदार गट हा संजय पाटील त्यांच्याशी संलग्न आहे. त्याचबरोबर अलिकडच्या काळातील संजय पाटील गटाचे विरोधक समजले जाणारे गोपीचंद पडळकर यांच्यासोबतही एक गट काम करत आहे. त्याचा फटकाही खासदारांना होणार आहे. खासदार संजय पाटील व गोपीचंद पडळकर यांचा वादाचा परिणाम म्हणून जत तालुक्यात मोठ्या संख्येने असलेला धनगर समाज खासदार पाटील यांच्यावरती नाराज आहे. ती नाराजी संजय पाटील हे कशी दूर करतात, त्यावरती मताचे राजकारण अवलंबून आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला दिवंगत नेते डॉ. पतंगराव कदम, मदन पाटील, आर. आर. आबा पाटील यांची उणीव प्रकर्षाने जाणवणार आहे. येणारी लोकसभेची निवडणूक पाहता वरकरणी भाजपचे पारडे जड वाटत असले तरी असले, तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचा परिणाम आणि त्यांना गोपीचंद पडोळकरांची साथ मिळाल्यास भाजप अडचणीत येऊ शकते. मात्र भाजपमध्ये गतवर्षी पेक्षा तुल्यबळ लढत होणार, असे चित्र पाहावयास मिळत आहे. नरेंद्र मोदींची लाट यावर्षी दिसणार नाही, असे चित्र आहे.


No comments:

Post a Comment