कोणताही व्यवसाय किंवा उद्योग निवडताना काही गोष्टी जरूर आत्मसात कराव्या लागतात. सगळ्यात म्हणजे स्वत:मध्ये विश्वास असला पाहिजे. नंतर सचोटी,चिकाटी,जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी पाहिजे. बेकरी व्यवसायदेखील यातून बहराला येऊ शकतो. अर्थात अन्न आणि प्रक्रिया व्यवसायात यायला अनेक संधी आहेत. फक्त तुमची नजर तीक्ष्ण पाहिजे,पुढचे तंत्रज्ञान व पदार्थ तुम्हाला बाजारात आणता आले पाहिजे.
बेकरी व्यवसायाची सुरुवात अगदी दोन ते अडीच लाखांतही होऊ शकतो. पाव वगळता खारी,बिस्किट, टोस्ट या उत्पादनांची निर्यातही करता येऊ शकते. उत्पादनाच्या विक्रीतून कमाल 30 टक्क्यांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. बेकरी व्यवसयाचे प्रशिक्षण देणार्या संस्थाही अनेक ठिकाणी आहेत. बेकरीसाठी पंतप्रधान मुद्रा योजनेतूनही कर्ज मिळते. बँकांशी आपले संबंध कसे आहेत,यावरही बरेच अवलंबून असते. एकदा बँकेने विश्वास ठेवला की, तुमच्या व्यवसायात कधीच अडचण येत नाही. फक्त तुमचा या व्यवसायात उतरताना अभ्यास असला पाहिजे. बेकरी व्यवसायात उतरण्यापूर्वी पहिल्यांदा एकाद्या बेकरीत चार-सहा महिने काम करण्याची आवश्यकता आहे. त्यातून पदार्थ तयार करण्यासाठी लागणार्या कच्च्या मालाची गुणवत्ता उत्तम असावी, हे लक्षात येईल. बिस्किट तयार करायचे असेल तर किती उष्णता द्यावी,किती चिकटपणा असावा किंवा यातील बरेचसे बारकावे लक्षात येण्यास मदत होईल. कधी कामगार अचानक आले नाहीत,तर आपणही हे काम पेलू शकतो, याची खात्री यामुळे येते.
व्यवसाय करायचा तर पहिल्यांदा पैशाचा प्रश्न समोर येतो. बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर ते वेळेत फेडण्यासाठी काटेकोर राहिले पाहिजे. त्यामुळे अडचणीच्यावेळी बँकच आपल्या मदतीला येईल. बँक पहिल्यांदा मोठी रक्कम कर्ज देणार नाही. पण विश्वास संपादन केल्यास ही रक्कम वाढू शकते.त्यामुळे विश्वास महत्त्वाचा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
No comments:
Post a Comment