Wednesday, January 23, 2019

दुष्काळी सवलती लागू करा: विक्रम सावंत

 जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात भयानक  चारा व पाणी टंचाई जाणवत आहे. दुष्काळी भागासाठी शासनाने जाहीर केलेल्या सोयी व सवलतीची अंमलबजावणी अद्याप सुरू झाली नाही. त्यामुळे शेतकरी व नागरिकांवर स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे .शासनाने घोषणा केलेल्या सवलतीची त्वरीत अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन जत तालुका काँग्रेसचे नेते विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली  जिल्हाधिकारी वि .ना . काळम पाटील यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आले आहे.

      याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , चारा छावणी किंवा चारा डेपो संदर्भात शासनाने अद्याप कोणतेही धोरण स्पष्ट केले नाही .त्यामुळे तालुक्यातील पशुधन धोक्यात आले आहे. शासन चारा लागवडीसाठी बियाणे उपलब्ध करून देत आहे . परंतु त्या बियाण्याची लागवड करून चारा तयार करण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही . त्यामुळ शेतकऱ्यांना चारा तयार करता येत नाही अशी खंत नीवेदन व्यक्त करण्यात आली आहे . शासनाने पशुधन वाचवण्यासाठी चारा डेपो व चारा छावण्या ऐवजी शेतकऱ्यांना थेट अनुदान द्यावे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी केल्यानंतर तात्काळ सर्वेक्षण करून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा. विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करण्यात आली आहे .अशी घोषणा शासनाने केली आहे .परंतु प्रत्यक्षात शैक्षणिक फी भरून घेतली जात आहे. भरुन घेतलेली  फी विद्यार्थ्यांच्या खात्यावर ताबडतोब परत वर्ग करण्यात यावी. इत्यादी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
    जिल्हाधिकारी काळमपाटील यांनी या  निवेदनाची व तालुक्यातील गंभीर परिस्थितीची दखल घेऊन तात्काळ प्रांताधिकारी तुषार ठोंबरे, तहसिलदार सचिन पाटील , पंचायत समिती गट विकास अधिकारी अर्चना वाघमळे यांच्याशी फोनवर संपर्क साधून त्वरित  उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना केली आहे.
      यावेळी माजी  माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील , जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आप्पासाहेब बिराजदार ,कार्याध्यक्ष बाबासाहेब कोडक , आटपाडी तालुका अध्यक्ष  डी. एम. पाटील , पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण ,बाजार समिती संचालक अभिजित चव्हाण ,तालुका काँग्रेस सेवादल अध्यक्ष काका शिंदे , महादेव साळुंखे ,सुरेश खांडेकर ,शिवराज पाटील इत्यादी मान्यवर  यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment