Wednesday, January 23, 2019

शिक्षकांच्या व्यथा गोव्याच्या अधिवेशनात मांडणार : शि. द. पाटील


जत,(प्रतिनिधी)-
 गोवा येथे होणार्या अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक अधिवेशनात शिक्षकांच्या 2005 नंतरच्या व्यथा केंंद्र शासनाकडे मांडणार आहे. महाराष्ट्रातील शिक्षकांचे अनेक ज्वलंत प्रश्न हे शिक्षक संघाच्या व्यासपीठावरच सुटले आहेत आणि ते प्रश्न सोडवण्याचा मान मला मिळाला असून इथून पुढेही मी जिवंत असेपर्यंत शिक्षकांच्या प्रश्नासाठी लढत राहणार असल्याचे मत माजी आमदार शिवाजीराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

पणजी (गोवा) येथे होणार्या अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाच्या देशपातळीवरील अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची राज्य महामंडळ सभा रविवारी झाली. यावेळी श्री. पाटील बोलत होते. प्राथमिक शिक्षकांचे सर्व प्रलंबित प्रश्न सोडवायचे असतील, तर पणजी येथे होणार्या अधिवेशनासाठी सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन शिवाजीराव पाटील यांनी महाराष्ट्रातील शिक्षकांना केले. शिक्षकांच्या प्रश्नासाठी अविरत ते लढा देत आहेत. वयाच्या नव्वदाव्या वर्षीही ते तेवढ्याच जोमाने शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी धडक देत आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधून अनेक विरोधी संघटनेचे कार्यकर्ते शिक्षक संघामध्ये सामील होत आहेत, अशी माहिती राज्य अध्यक्ष राजाराम वरुटे यांनी दिली.
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे देश पातळीवरील अधिवेशन गोवा पणजी येथे असून त्यासाठी केंद्र शासनाने दि. 4 ते 13 फेब्रुवारीपर्यंत दहा दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजूर केली आहे. या अधिवेशनासाठी केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री व महाराष्ट्र राज्याचे सर्व मंत्रिमंडळ उपस्थित राहणार असून शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लागणार असल्याचा विश्वास राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांनी व्यक्त केला आणि उपस्थित असणार्या सर्व जिल्हाध्यक्षां कडून महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्न हे समजावून घेतले. सर्व जिल्हाध्यक्षांनी आपले विचार मांडले व राज्य सरचिटणीस केशवराव जाधव यांनी राज्यातून आलेल्या सर्व पदाधिकार्यांचे आभार मानले. यावेळी राज्य संघाचे पदाधिकारी  माधवराव पाटील, धैर्यशील पाटील, बाळासाहेब काळे,लायक पटेल, मधुकर काठोळे; तर सांगली जिल्हाध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी, जिल्हा कोषाध्यक्ष अमोल माने, नेते विजयकुमार चव्हाण, जगन्नाथ कोळपे, विकास शिंदे, प्रदीपकुमार मजलेकर, सुरेश पवार, संतोष गुरव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment