जत,(प्रतिनिधी)-
पोटाची खळगी भरण्याकरिता राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, बिहार, ओडिशा, छत्तीसगड या राज्यांतून पोटाची खळगी भरण्याकरिता शहराबरोबरच ग्रामीण भागातदेखील मोठ्या प्रमाणात मजूर स्थलांतर करून आले आहेत. पुरुषांबरोबर महिला आणि लहान मुलांची संख्याही मोठी आहे.
डाळींब व्यापार, मजुरी,शेती, रस्ते खोदाई, गटारी काम,हार्डवेअर, तसेच रस्ते बांधणी, बांधकाम क्षेत्रातील विविध प्रकारची कामे, केसकर्तन, फरशी बसवण्याची कामे, छोटे कारखाने अशा अनेक ठिकाणी कष्टाची आणि जोखमीची कामे करण्यासाठी परप्रांतीय मजुरांच्या लोंढ्यांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. परप्रांतीय तरुणांची रात्रंदिवस कष्ट आणि जोखमीची कामे कारण्याची तयारी स्थानिक तरुणांना प्रेरणादायी ठरणारी आहे. मागासलेल्या राज्यांत रोजगाराचा प्रश्न बिकट निर्माण झाला आहे. तरुणांच्या हाताला पुरेसे काम नाही आणि खायाला अन्नदेखील नाही, अशा अवस्थेत गावी थांबून करायचे काय आणि खायाचे काय, या चिंतेने अनेकजण रोजगाराच्या शोधार्थ काम मिळेल त्या ठिकाणी स्थलांतरित होत आहेत.
मागासलेल्या राज्यांतील मजुरीपेक्षा महाराष्ट्र राज्यात चांगली मजुरी मिळत आहे. पुरुषांना आणि महिलांना वेगवेगळा पगार दिला जातो; मात्र रात्रंदिवस जादा काम करून मजूर दुपटीने पगार मिळवत आहेत. रोजगारासाठी आलेल्या कुटुंबांतील शेकडो लहान बालके शिक्षणापासून वंचित राहत आहेत. ज्या वयात वही-पेन घेऊन शाळेला जायचे, त्या वयात मुलांना विविध प्रकारची कष्टाची कामे करावी लागत आहेत. गावाकडे कामच नाही; त्यात कुंटुबाचा दैनंदिन उदरनिर्वाह कसा करायचा, या विवंचनेत कुटुंबे स्थलांतरित होत आहेत.
भागात विविध प्रकारची कामे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. अशी कोणत्याही स्वरूपाची कामे करण्यासाठी परप्रांतीय मजूर येत आहेत. भरपूर काम करून भरपूर पगार मिळत आहे. त्यांच्या कष्टाला तोड नाही. शहरातील सर्व क्षेत्रांत परप्रांतीय मजूर कामधंदा करीत आहेत. आता शहरातील कामांबरोबरच ग्रामीण भागातदेखील या मजुरांची संख्या सध्या झपाट्याने वाढत आहे. या उलट कोणतेही काम करण्याची लाज वाटणारे मराठी तरुण मात्र नोकरी, कामाच्या शोधात शहराकडे धाव घेत आहेत. सात आठ वर्षांपूर्वी आलेले परप्रांतीय मजूर आज चांगल्या राहणीमानात राहात आहे.
No comments:
Post a Comment