सर्वाधिक जत तालुक्यातील 32 गावांना टँकर
जत,(प्रतिनिधी)-
जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळी परिस्थिती गंभीर बनत आहे. पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत असून ७० गावांसह ४६६ वाड्या-वस्त्यांवरील एक लाख ४२ हजार लोकसंख्येला ६० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मार्चअखेर १६९ टँकर सुरु करावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चाराटंचाई भीषण असली तरी, छावण्या अथवा चारा डेपोची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी सवलती, सुविधांकडेही कानाडोळा केला जात असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील बहुतांशी भागाकडे पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या पाणी टंचाईने जिल्ह्यातील बहुतांश गावांवर दुष्काळाची छाया गडद झाली आहे. पाण्याअभावी हाता-तोंडाला आलेली पिकेही वाया जात आहेत. राज्य शासनाने जिल्ह्यातील पाच तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. पन्नासपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांत तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, जत आणि आटपाडी तालुक्यांतील २४६ गावांचा समावेश आहे. अहवाल शासनाला पाठविण्यात आला होता. दुष्काळी स्थिती गंभीर होत असल्याने शासनाकडून याची दखल घेण्यात आली होती. दुष्काळसदृश आटपाडी तालुक्यात सर्वात कमी ३१ टक्के पाऊस झाला. जतमध्ये ५६.७५ टक्के, कवठेमहांकाळ ६५.८६, खानापूर ८०.१४, तासगाव ५४.७०, पलूस ९२.२६ आणि कडेगाव तालुक्यात १०६.२३ टक्के पावसाची सरासरी आहे. मिरज पूर्व भागाला दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत.
पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याने टँकर सुरु करण्याच्या मागणीत वाढ होत आहे. सध्या ७० गावे, ४६६ वाड्या-वस्त्यांवरील एक लाख ४२ हजार लोकसंख्येला ६० टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. जत तालुक्यातील ३० गावांना ३२ टँकरने, आटपाडीतील २२ गावांना १६ टँकरने, खानापूरच्या सहा गावांना पाच टँकरने, तासगावमधील तीन गावांना एका टँकरने, तर कवठेमहांकाळमधील नऊ गावांना सहा टँकरने पाणी दिले जात आहे.
पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी खासगी ८९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. मार्चअखेर १६९ टँकर सुरु करावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पश्चिम भागातून उसाचे वाडे मागवले जात आहे, परंतु ते जादा दराने खरेदी करुन जनावरांना जगविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कवडीमोल किमतीने जनावरांची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चारा छावण्या सुरु होणार का? याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.
महावितरणकडून शेतकऱ्यांची अडवणूक
दुष्काळी गावातील शेती पंपांची वीज खंडित केली जाणार नाही; मात्र अनेक ठिकाणी रोहित्र दुरुस्तीसाठी बिल भरल्याशिवाय महावितरण तिकडे फिरकतच नसल्याचे चित्र आहे. शिवाय गेल्या सहा महिन्यांपासून नव्याने एकाही शेतकऱ्याचा विद्युत पुरवठा जोडण्यात आलेला नाही.
No comments:
Post a Comment