Saturday, January 12, 2019

तरुणाईला लागलेय मेगा भरतीचे वेध

जत,(प्रतिनिधी)-
सध्या एकीकडे नेतेमंडळींना लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत, तर दुसरीकडे मात्र तरुणांईला मेगा भरतीचे वेध लागले आहेत. नूतन वर्षाच्या सुरूवातीलाच मेगा भरतीचीच जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ही मेगा भरती फेब्रुवारी, मार्चमध्ये पूर्ण होणार का?  का निवडणूक आचारसंहितेच्या कचाट्यात सापडणार याची धास्ती तरुणाईला लागून राहिली आहे.

    फेब्रुवारीमध्ये मेगा भरती होणार की नाही याचीच चर्चा सोशल मीडियावर रंगू लगली आहे. या भरतीत आपली नोकरी निश्‍चित करण्यासाठी तरुणाई दिवस-रात्र अभ्यास करत आहे. त्यातच यू ट्यूबवरही मेगा भरतीबाबत रोज डझनभर व्हिडीओ अपलोड होत आहेत. अपलोड झालेल्या व्हिडीओंमध्ये काही व्हिडिओ मेगा भरती होणार असे सांगणारे आहेत, तर काही भरती होणार नाही, हे चित्र दाखवणारे आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
     भाजप सरकारने सत्तेत येण्यापूर्वी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय भरती करू, असे आश्‍वासन राज्यातील युवकांना दिले होते. सत्तेत आल्यानंतर सरकारने त्याची आश्‍वासनपूर्ती करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या. दोन वर्षांपूर्वीच सरकारने राज्यातील विविध विभागांतील 72 हजार पदे दोन टप्प्यात भरणार असल्याचे घोषित केले होते. त्यानुसार ऑगस्ट 2018 मध्ये पहिल्या टप्प्यातील 36 हजार पदे भरण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली होती. दरम्यान, मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लागल्याने सरकारने पुन्हा मेगा भरतीच्या प्रक्रियेस प्रारंभ केला आहे. दोन टप्प्यात होणारी मेगा भरती आता एकाच टप्प्यात होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे येत्या फेब्रुवारीमध्येच मेगा भरतीची प्रक्रिया पूर्ण होण्याचे संकते नुकतेच खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे आता या बहुचर्चित मेगा भरतीचे पडसाद सोशल मीडियावर उमटू लागले आहेत. सध्या सोशल मीडियावर मेगा भरती येत्या फेब्रुवारीपूर्वी होणार की नाही, या चर्चेला उधाण आले आहे.   फेब्रुवारीमध्ये सरकार भरती प्रक्रिया पूर्ण करणारच, असे सांगणारे आहेत. याचवेळी काहीजण फेब्रुवारीमध्ये भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येणार्‍या अडचणींचा पाढा वाचताना दिसत आहेत. या चर्चेमुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये मात्र संभ्रम निर्माण होत आहे.
     मेगा भरतीबाबत यू ट्यूबवरही दररोज डझनभर व्हिडिओ अपलोड होत आहेत. मेगा भरतीचा अभ्यास कसा करावा, कोणती पुस्तके वाचावित, कोणत्या विषयांवर किती प्रश्‍न येतील, अशा एक ना अनेक प्रश्‍नांवर भाष्य करणारे असंख्य व्हिडिओ अपलोड झाले आहेत. परंतु प्रत्येक व्हिडीओमध्ये वेगवेगळी माहिती सांगितली जात असल्याने हे व्हिडीओ पाहून विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण होत आहे. हा संभ्रम मेगा भरतीची प्रत्यक्ष जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर दूर होणार आहे.
तरुणाईची धाकधूक वाढली...
मेगा भरतीसाठी जानेवारी व फेब्रुवारी हा दोन महिन्याचा अल्पकाळच शिल्लक आहे. मार्च एप्रिलमध्ये लोकसभा निवडणूका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया जलद झाली तरच कारवाई पूर्ण होणार आहे. त्यामुळे तरुणाईची धाकधूक वाढली आहे. ग्रामीण भागातील युवक-युवती मेगा भरतीच्या दृष्टीने परीक्षेची तयारी करत आहेत.

No comments:

Post a Comment