जत,(प्रतिनिधी)-
पोलिओचे निर्मूलन करण्यात आरोग्य विभागाला यश आले
आहे. पण, राज्यात कुष्ठरोगाचे रूग्ण आजही आढळून येत आहेत. पण,
यामध्ये विदर्भ आणि मराठवाडय़ात नव्याने सापडणाऱया रूग्णांची संख्या
सर्वाधिक आहे. पश्चिम महाराष्ट्रात मात्र नव्याने आढळून येणाऱया रूग्णांची संख्या
झपाटय़ाने कमी झाली असून सध्या याचे प्रमाण 0.35 इतके आहे.
कुष्ठरोगाच्या निर्मुलनासाठी केंद्र आणि राज्य
शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात. या रोगाच्या रूग्णांची शोध
मोहीम राबवून त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात येतात. तर, रूग्ण
शोधून आणणाऱया अंगणवाडी सेविका, परिचारिका, आशा वर्कर आणि सामाजिक कार्यकर्त्यांना दोनशे रूपयांचे मानधनही देण्यात
येते. शासनाने सप्टेंबरमध्ये कुष्ठरूग्णांची विशेष शोध मोहीम राबविली. यामध्ये
सर्वाधिक रूग्ण हे विदर्भ आणि मराठवाडा विभागात आढळून आले. पश्चिम महाराष्ट्रातही
कुष्ठरूग्ण आढळून आले. पण, याचे प्रमाण सर्वात कमी असल्याचे
कुष्ठरोग सेवा विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
कुष्ठरोगाचे प्रमाण हे 10 हजार
जनसंख्येमागे 13 इतके होते. पण, केंद्र
आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱया अभियानामुळे हे प्रमाण प्रचंड
कमी झाले आहे. सोलापूर जिल्हय़ात राबविण्यात आलेल्या रूग्णशोध मोहिमेमध्ये 178
रूग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर मोफत उपचारही सुरू करण्यात आले
आहेत. जिल्हय़ाची लोकसंख्येचा विचार करता हे प्रमाण केवळ 0.35 इतके आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरसह पुणे, सातारा,
कोल्हापूर आणि सांगली या जिल्हय़ांचेही प्रमाण असेच आहे. विदर्भ आणि
मराठवाडय़ात हे प्रमाणमात्र एक पेक्षा अधिक असल्याचेही सांगण्यात आले.
पोलिओ प्रमाणेच कुष्ठरोगाच्या निर्मूलनासाठीही विशेष
मोहिम राबविण्यात येत आहेत. पण, काही रूग्ण समाजाच्या भीतीपोटी
उपचारासाठी पुढे येत नसल्याची बाबही समोर आली आहे. या रोगाच्या निर्मुलनासाठी 26
जानेवारी 2018 रोजी आयोजित करण्यात आलेल्या
ग्रामसभेमधून जनजागृती राबविण्याचे आदेशही कुष्ठरोग सेवा विभागाच्यावतीने देण्यात
आले आहेत. याशिवाय 30 जानेवारी ते 15 फेब्रुवारी
2018 या पंधरवडय़ाच्या काळात संपूर्ण राज्यात विशेष जनजागृती
मोहिम हाती घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment